भारताच्या ४० टक्के जनतेला लाभ देणारी जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असलेली ‘आयुष्मान भारत’ ला फेक वेबसाईट्सचा फटका बसू लागला आहे. या वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्समुळे चुकीची माहिती पसरत असल्याने ८९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सप्टेंबर महिन्यात झाला. मात्र, या योजनेबाबत काही वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्समधून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. यातील बहुसंख्य वेबसाईट्सवरुन रुग्णांना लाभार्थी कार्ड देऊ असा दावा करत आहेत. हे कार्ड घेतल्यावरच ‘आयुष्मान भारत’ या योजनेचा लाभ घेता येईल, असा दावा या वेबसाईट्सवर केला जात आहे. तसेच काही वेबसाईट्सवर शुल्क आकारुन या योजनेचा लाभ घेता येईल असा दावा करण्यात आला होता. शेवटी या प्रकरणी केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वेबसाईट्स व अॅपविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. या आधारे पोलिसांनी ८९ वेबसाईट्स व अॅपविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वेबसाईट, अॅप सुरु करणारे किंवा तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका वेबसाईटवर ‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी ‘आयुष्मान मित्र’ या पदासाठी भरती सुरु असल्याची जाहिरात होती. आय़ुष्मान योजनेबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात एक कर्मचारी नेमण्यात आला आहे. मात्र, यासाठी भरती करण्यासाठी कोणत्याही एजन्सीची नियुक्ती करण्यात आलेली नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे. अशा वेबसाईट्स आणि अॅप्स ब्लॉक करण्यासाठी पत्रव्यवहारदेखील सुरु असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://www.abnhpm.gov.in/ या वेबसाईटवर किंवा या १४५५ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.