भाजपशी हितसंबंध असल्याचे सिद्ध केले, तर पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊ, अशी आक्रमक भूमिका घेणारे गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींच्या कथित विधानावर घुमजाव केले तर, कपिल सिबल यांनी राहुल यांना प्रत्युत्तर देणारे ट्विट काढून टाकले. कार्यसमितीच्या बठकीतून निर्माण झालेला नवा वाद ‘हस्तक्षेपा’नंतर सामंजस्याने मिटवला गेला.

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे भाजपशी संबंध असल्याच्या राहुल गांधींच्या कथित विधानावर आझाद यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, राहुल गांधी यांनी भाजपच्या हितसंबंधाचा आरोप केलेला नाही. आपण पदे सोडण्याचे केलेले विधान राहुल यांच्या विधानावरील प्रतिक्रिया नव्हे, अशी सारवासारव आझाद यांनी ट्विटद्वारे केली. राहुल गांधी यांनी कार्यसमितीत वा समितीच्या बाहेरही, संबंधित पत्र भाजपच्या वतीने लिहिले गेल्याचे म्हटलेले नाही. काल (रविवारी) काही काँग्रेस नेत्यांनी तसा आरोप केला होता. त्यासंदर्भात मी विधान केले. भाजपशी संबंध असल्याचे सिद्ध केले तर माझी सर्व पदे सोडण्याची तयारी असल्याचे म्हटले, असे ट्विट आझाद यांनी केले.

राहुल गांधी यांच्या कथित विधानाचा आधार घेत, ज्येष्ठ नेते व ‘पत्रलेखक’ कपिल सिबल यांनी राहुल यांना ट्विट करून तातडीने प्रत्युत्तर दिले. मात्र, आपण ‘भाजपशी लागेबंधे असल्याचे’ म्हटले नसल्याचे खुद्द राहुल गांधी यांनी व्यक्तिश फोन करून स्पष्ट केल्याचे सिबल यांना कळवले. त्यानंतर राहुल यांच्या कथित विधानाला आक्षेप घेणारे ट्विट काढून सिबल यांनी काढून टाकले. ३० वर्षांत एकदाही भाजपच्या समर्थनार्थ कोणत्याही विषयावर विधान केलेले नाही, असे ट्विट सिबल यांनी केले होते.

सिबल यांच्या ट्विटवर तातडीने पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हस्तक्षेप करत, राहुल यांनी ज्येष्ठ नेत्यांचा भाजपशी संबंध असल्याचे विधान केलेले नाही. दिशाभूल होऊ देऊ नका, असे ट्विट करून वादाची तीव्रता कमी केली. त्यानंतर राहुल यांनी स्वत सिबल यांना फोन करून भाजपचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर समाधान व्यक्त करत सिबल यांनी आधीचे ट्विट मागे घेत असून राहुल यांनी आपल्याला फोन केल्याची माहिती दिली व सिबल यांनी ट्विट मागे घेतले.

कुमारी सेलजा यांचा थेट आरोप

ज्येष्ठ नेत्यांच्या पत्राचा भाजपशी संबंध जोडला नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, गांधी निष्ठावान व  हरियाणा प्रदेशाध्यक्ष कुमारी सेलजा यांनी मात्र ज्यांनी पक्षनेतृत्वात बदलाची मागणी केली त्या ज्येष्ठ नेत्यांचा भाजपशी घनिष्ट संबंध असल्याचा थेट आरोप केला. ज्यांनी काँग्रेसच्या जीवावर सत्तेची पदे उपभोगले ते पक्षनेतृत्वाला आव्हान देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. सेलजा त्यांचे प्रतिस्पर्धी भूपिंदर हुडा यांचीही पत्रावर स्वाक्षरी आहे.