उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ मंत्री आझम खान यांनी अमरसिंह यांची तुलना कचऱ्याशी केली आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसाला एके काळचे त्यांचे मित्र अमरसिंह यांची प्रमुख हजेरी होती. त्यावरून आझम यांनी वादळाबरोबर कचराही येतो, असे वक्तव्य केले आहे.

मुलायमसिंह यांचे मूळ गाव असलेल्या सैफई येथे वाढदिवसानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आझम खान व अमरसिंह यांच्यात पूर्वीपासून वैर आहे. अमरसिंह यांची मुलायमसिंह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसलेली जवळीक पाहता त्यांना पक्षात पुन्हा घेतले जाण्याच्या चर्चेने आझम खान अस्वस्थ आहेत. वाढदिवसाला मुलायमसिंह व अमरसिंह यांनी एकमेकांना केक भरवला. केक कापण्याचा समारंभ मध्यरात्री ठेवलेला असताना तो वेळेपूर्वी घेणे हे माझ्याविरुद्ध षड्यंत्र होते, असा आरोपही आझम यांनी केला. गेल्या वर्षी मुलायमसिंह यांचा वाढदिवस मध्यरात्रीच साजरा करण्यात आला होता याची आठवण आझम यांनी करून दिली. या वेळी तो आठ वाजता घेण्यात आला. तसेच त्या वेळी व्यासपीठावर मुलायमसिंह यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त अमरसिंह हे एकमेव होते. त्यामुळेच अमरसिंह यांच्या पक्षात परतण्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे अमरसिंह यांनी नुकतीच मुलायमसिंह व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी उत्तर प्रदेशातील सैफई येथे शनिवारी झालेल्या समारंभाला त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय अमरसिंह यांनीही हजेरी लावली.