अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठामध्ये महाकुंभ मेळ्यावर व्याख्यान देण्यासाठी गेलेले उत्तर प्रदेशातील मंत्री आझम खान यांना बुधवारी बोस्टन विमानतळावर अडविण्यात आले. मुस्लीम असल्यामुळे आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिल्यामुळे भारतीय मुस्लिमांना मिळणाऱ्या दुजाभावाचा नवा वाद शुक्रवारी उफाळून आला. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमवेत अमेरिकेमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेलेल्या आझम खान यांना विमानतळावर दहा मिनिटांहून अधिक काळ अडविण्यात आले. विशेष पारपत्र असूनही त्यांची अधिक चौकशी करण्यात आली. दरम्यान, समाजवादी पक्षाने या अपमानास्पद वागणुकीबाबत शुक्रवारी सरकारकडे निषेध व्यक्त केला; तर या प्रकरणी योग्य तो जाब विचारला जाईल, असे बोस्टन दूतावासाने स्पष्ट केले. विविध नेते, अभिनेते आणि नागरिकांना केवळ नावामुळे अमेरिकेत मिळणाऱ्या सापत्न व अपमानास्पद वागणुकीबाबत सपा नेते राम कुशवाहा यांनी कानपूरमध्ये निषेध व्यक्त केला. या अपमानामुळे व्याख्यान कार्यक्रम आटोपल्यावर आपण तात्काळ भारतामध्ये परतणार असल्याचे आझम खान यांनी स्पष्ट केले.
नक्की झाले काय?
ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून अखिलेश यादव, आझम खान यांच्यासह उत्तर प्रदेशातील मंत्री बोस्टन विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना आगमन फॉर्म भरण्यासाठी मदत केली. मात्र काही वेळाने एका महिला अधिकाऱ्याने खान यांना १० मिनिटांहून अधिक काळ अधिक चौकशीसाठी रोखून धरले. यामुळे संतप्त झालेल्या खान यांनी आपण मुस्लीम असल्याने आपल्याला ही अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचे म्हटले. त्यावेळी आपण आपले कर्तव्य बजावत असल्याचे महिला अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या महिला अधिकाऱ्यासोबत चाललेला वाद इतका मोठा झाला की तिने खान यांना आपल्याला त्रास दिल्याची तक्रार पोलिसांकडे करेन अशी धमकी दिली. अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर ज्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चौकशी होते, त्याचप्रमाणे खान यांची चौकशी करण्यात आली असल्याचा दावा या महिला अधिकाऱ्याने केला. यावेळी उच्च अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून खान यांना विमानतळावरून बाजूला नेले.