देशात सध्या टप्प्याटप्याने लसीकरण मोहिम सुरु असून विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी ६० दिवसांत ५० कोटी लोकांचं लीसकरण करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. अझीम प्रेमजी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना लसीकरण मोहिमेच खासगी क्षेत्राला सहभागी करुन घेतलं जावं असा सल्ला दिला. खासगी क्षेत्रालाही लसीकरण मोहिमेत सामावून घेतल्यास फक्त दोन महिन्यात देशभरातील ५० कोटी लोकांचं लसीकरण केलं जाऊ शकतं असा दावा त्यांनी केला आहे.

“मला वाटतं जर सरकारने लवकरात लवकर खासगी क्षेत्राला सहभागी करुन घेतलं तर ६० दिवसांत ५० कोटी लोकांचं लसीकरण करण्याचा टप्पा आपण गाठू शकतो असं आश्वासन आम्ही देऊ शकतो,” असं अझीम प्रेमजी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु चेंबर ऑफ इंडस्ट्री अॅण्ड कॉमर्समध्ये आयोजित चर्चासत्रादरम्यान अझीम प्रेमजी यांनी हा सल्ला दिला. हे शक्य असून खासगी क्षेत्राचा सहभाग लसीकरणाच्या टक्केवारीला चांगली गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- “करोनाविरुद्धच्या लढाईत भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करतोय”; मोदी सरकारच्या मदतीची UN कडून दखल

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोनाविरोधातील प्रतिबंधक लस आपण रेकॉर्ड वेळेत आणली असून आता मोठ्या प्रमाणात ती पोहोचवण्याचं आव्हान आहे”. अझीम प्रेमजी यांनी यावेळी सरकार आपल्याला शक्य ते सर्व करत असल्याचं मान्य करत खासगी क्षेत्राचा सहभाग यामध्ये मदतशीर ठरु शकतो असं म्हटलं.

आणखी वाचा- संयुक्त राष्ट्र म्हणते, “जगातील १३० हून अधिक देशांना करोनाची एकही लस मिळालेली नाही तर दुसरीकडे…”

“सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचा एक डोस ३०० रुपये दराने मिळण्याची शक्यता आहे आणि रुग्णालयं, खासगी नर्सिंग होम प्रत्येक डोस १०० रुपये किंमतीने देतात. म्हणजे प्रत्येकी ४०० रुपये खर्चाने आपण जास्तीत जास्त लोकांना करोना लस देऊ शकतो,” असं अझीम प्रेमजी यांनी म्हटलं आहे.

करोना संकटात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करणाऱ्या अझीम प्रेमजी यांनी करोना हा आपल्या देशातील आरोग्य व्यवस्थेसाठी ‘वेक अप कॉल’ असल्याचं अधोरेखित केलं आहे. आतापर्यंत देशभरातील १ कोटी ११ लाख करोना योद्धे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लस घेण्यात आली आहे.