भारतीय हॉकी संघाने शनिवारी आयर्लंडचा ४-१ च्या गोल फरकाने धुव्वा उडवत सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत पाचवे स्थान मिळवले. या विजयासह भारताने शुक्रवारी आयर्लंडकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला. अखेरच्या साखळी सामन्यात भारत दुबळया आयर्लंडवर सहज विजय मिळवेल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात आयर्लंडनेच ३-२ च्या गोलफरकाने भारताचा पराभव केला. त्यामुळे भारताच्या पदक मिळवण्याच्या आशा संपुष्टात आल्या.

सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने शनिवारी आपल्या खेळात कमालीची सुधारणा केल्याचे दिसून आले. भारताकडून वरुण कुमारने सामन्याच्या पाचव्या आणि ३२ व्या मिनिटाला, शिलानंद लाकराने २८व्या मिनिटाला आणि गुरजत सिंगने ३७ व्या मिनिटाला गोल केला. आयर्लंडकडून शेवटच्या सत्रात ज्युलियन डालेने ४८ व्या मिनिटाला गोल केला. पण आयर्लंडला पराभव टाळता आला नाही.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती पण आयरिश गोलकिपर जामी कार्रने गोल करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. त्यानंतर भारताला आपल्या पहिल्या गोलसाठी फार प्रतिक्षा करावी लागली नाही. पाचव्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. वरुण कुमारने या संधीचे गोलमध्ये रुपांतर करुन भारताला १-० ची आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या २८व्या मिनिटाला शिलानंद लाकराने निलम सेसकडून मिळालेल्या पासवर नियंत्रण मिळवत गोलमध्ये रुपांतर केले आणि भारताची आघाडी २-० ने वाढवली. त्यानंतर चार मिनिटांनी भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. वरुण कुमारने कुठलीही चूक न करता त्याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. त्यानंतर पाचच मिनिटांनी गुरजत सिंगने चौथा गोल करुन भारताची आघाडी ४-० ने वाढवली. भारताने साखळी गटात मलेशियावर ५-१ ने मात केल्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला शुक्रवारी आयर्लंडवर मोठ्या फरकाने मात करणे गरजेचे होते. पण भारताने ही लढत गमावल्यामुळे पदकाच्या आशा संपुष्टात आल्या.