News Flash

बाबा का ढाबा – यू ट्यूबर गौरव वासनविरोधात दिल्ली पोलिसांकडून खटला दाखल

मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये गौरवने अफरातफर केल्याचा कांता प्रसाद यांनी केला आहे आरोप

दिल्लीतील मालविया नगर परिसरातील ‘बाबा का ढाबा’ सध्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आहे. युट्यूबर गौरव वासन याने ढाब्याचा व्हिडीओ पहिल्यांदा शूट केला होता. मात्र, याच गौरव वासन विरोधात बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी अखेर ४२० चा खटला दाखल केला आहे. मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये गौरवने अफरातफर केल्याचा कांता प्रसाद यांचा आरोप आहे.

कांता प्रसाद यांचा दावा आहे की, जवळपास २० लाख रुपये आले होते. ३१ ऑक्टोबर रोजी कांता प्रसाद यांनी युट्यूबर गौरव वासन विरोधात तक्रार दाखल केली होती व म्हटले होते की, आपल्याला मदतीसाठी पाठवलेल्या पैशांमध्ये गौरवने अफरातफर केली आहे. ऑक्टोबर महिन्यात गौरव त्यांना भेटला व त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने एक व्हिडिओ शूट केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करून बाबा का ढाबासाठी देणगी देण्याचे आवाहन केले होते.

तर, याप्रकरणी गौरव वासवान याने म्हटले आहे की, कांता प्रसाद खोटे आरोप करत आहेत. ८ ऑक्टोबर रोजी ७५ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मी स्वतः त्यांच्यासोबत बँकेत गेलो होतो. त्यानंतर जे पैसे माझ्या खात्यात आले होते ते देखील मी त्यांना दिले होते. ज्यामध्ये २ लाख ३३ हजार रुपयांचा चेक, १ लाखाची एनइएफटी आणि ४५ हजार पेटीएमच्या पैशांचा समावेश आहे. बाबांची मी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर काही दिवस अगोदर अभिनेता आर माधवनने प्रतिक्रिया दिली होती. आर माधवनने ट्वटि करत नाराजी व्यक्त केली होती. ‘बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांची फसवणूक झाली? अशा गोष्टी लोकांना चांगले कार्य करण्यापासून थांबवतात. ज्याने कोणी फसवणूक केली आहे त्याला पोलिसांनी पकडले आणि शिक्षा दिली तर लोकांचा अशा गोष्टींवर पुन्हा विश्वास बसणार. माझा दिल्ली पोलिसांवर विश्वास आहे’ या आशयाचे ट्विट त्याने केले होते.

काय म्हणनं आहे कांता प्रसाद यांचं ?
कांता प्रसाद यांनी केलेल्या आरोपानुसार, गौरवन लोकांना आपलं तसेच आपल्या कुटुंबाच्या बँक खात्याचा क्रमांक देत मिळणारी मदत वळती केली आणि ते पैसे परतही केले नाहीत. आता आपल्याला जास्त ग्राहकही मिळत नाही. आधी दिवसाला १० हजार कमवत होतो, आता ३ ते ५ हजारांचा व्यवसाय होतो. लोक जेवण्यासाठी कमी आणि फोटो काढण्यासाठी जास्त येत आहेत.

गौरवने काय सांगितलं आहे?
कांता प्रसाद यांनी केलेल्या आरोपांवर गौरवनेही उत्तर दिलं असून सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याचं सांगितलं आहे. “माझ्याविरोधात खोटे आरोप करुन बदनामी केला जात आहे. माझ्या खात्यात २५ लाख रुपये जमा झाल्याचा दावा केला जात असून खोटा आहे. मी माझं बँक स्टेटमेंट दिलं असून सर्व पैसे कांता प्रसाद यांच्या खात्यात वळवले आहेत. मला २५ लाख रुपये मिळाल्याचं कांता प्रसाद यांच्या डोक्यात कोण भरवतंय माहिती नाही,” असं त्याने म्हटलं आहे.

अशा पद्दतीने बदनामी झाल्यास लोकांचा माणुसकीवरुन विश्वास उठेल असं गौरवचं म्हणणं आहे. असे हजारो बाबा आणि अम्मा आहेत ज्यांना मदत हवी असून लोक माझ्या व्हिडीओनंतर मदत करत आहेत. पण अशा आरोपांमुळे या मदततीत खंड पडत आहे असंही तो म्हणाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 9:12 am

Web Title: baba ka dhaba delhi police files case against youtuber gaurav vaswan msr 87
Next Stories
1 “नवा रेकॉर्ड सेट करा,” नरेंद्र मोदींचं बिहारमधील मतदारांना आवाहन
2 पाकिस्तानात जायचं असतं तर…कलम ३७० पुन्हा लागू होईपर्यंत मरणार नाही : फारूख अब्दुल्ला
3 US Election 2020: पराभवाच्या छायेत असणाऱ्या ट्रम्प यांचा बायडेन यांना इशारा, म्हणाले…
Just Now!
X