बाबा का ढाबा वादासंदर्भात दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयासमोर अहवाल सादर केला आहे. यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदत म्हणून बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्या खात्यावर  ४२ लाख रुपये जामा झाले होते. कांता प्रसाद यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन या खात्यासंदर्भातील माहिती देण्यात यावी अशी मागणी केली होती. तर दुसरीकडे या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी युट्यूबर गौरव वासनशी संबंधित बँक खात्यांची चौकशी करत आहे. या प्रकरणामध्ये अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणात अद्याप आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले नाही.

नक्की पाहा : लाईट्स, CCTV कॅमेरा अन् गल्ला… ‘बाबा का ढाबा’ फेम कांता प्रसाद यांच्या नव्या रेस्तराँची झलक

यूट्यूबर गौरव वासनने सोशल नेटवर्कींगवर बाबा का ढाबाचा व्हिडीओ शेअर करत मदतीचे आवाहन करत स्वत:चा आणि पत्नीचा क्रमांक दिला होता. त्यानंतर देशभरातील अनेकांनी ऑनलाइन ट्रानझॅक्शनच्या माध्यमातून कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नीला मदत केली. गौरवने जमा झालेली सर्व रक्कम बाबांना दिल्याचे सांगितले होते. मात्र तरीही यानंतर चार लाख २० हजार रुपयांवरुन वाद होता. या प्रकरणात बाबाने मालवीय नगर पोलीस स्थानकामध्ये तक्रा दाखल केली होती. गौरवने आपली फसवणूक केल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला होता. गौरव वासन यांचे अनेक बँक खात्यांची माहिती मदत मागण्यासाठी दिली होती आणि त्या खात्यांवर पैसे गोळा केले होते असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस या दृष्टीकोनातूनही तपास करत आहेत.

कांता प्रसाद यांनी लोकांनी केलेल्या मदतीच्या जोरावर मालवीय नगरमध्ये स्वत:चं रेस्तराँ सुरु केलं आहे. सध्या या रेस्तराँध्ये ग्राहकांची गर्दी कमी असली तरी ऑनलाइन प्रतिसाद चांगला आहे. काही महिन्यापूर्वीच दिल्ली पोलिसांकडे कांता प्रसाद यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार केली होती. धमकी देणारी व्यक्ती ही गौरवाचा भाऊ असल्याचा दावा कांता यांनी केला होता. मात्र रेस्तराँच्या उद्घाटनाच्या वेळी कांता प्रसाद यांनी आपण आज जे काही यश मिळवलं आहे त्यामागे गौरवचा हात असल्याचे म्हटलं होतं.