पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी बाबा राम रहीम याला पंचकुलाच्या सीबीआयच्या विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ जानेवारी रोजी याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षा १७ जानेवारीला सुनावण्यात येईल असे कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार आज हा निकाल आला असून यामध्ये राम रहिमसोबत अन्य तीन दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठावला आहे.

सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. त्याचबरोबर कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्णण लाल या तिघांनाही कोर्टाने या हत्याप्रकरणी दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत या चौघांनाही कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २००२ रोजी रामचंद्र छत्रपती यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्यं पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी उघड केली होती.

पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनीच बाबा राम रहीमचा खरा चेहरा जगासमोर आणला होता. साध्वींसोबत झालेल्या बलात्काराची बातमी रामचंद्र छत्रपती यांनी आपलं वृत्तपत्र ‘पूरा सच’ मध्ये छापलं होतं. यानंतर वारंवार त्यांना धमक्या मिळत होत्या. यानंतरही रामचंद्र छत्रपती निर्भीडपणे बाबा राम रहीमविरोधात लिहित होते.