आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरूवात झाल्यापासून बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या बॅनरखालीच सीमा सुरक्षा दलाचं (बीएसएफ) योग शिबीर व्हायचं, पण आता त्यांची जागा ईशा फाउंडेशनने घेतली आहे. बीएसएफने पतंजलीसोबत करार संपवून आता सदगुरू जग्गी वासूदेव यांच्या ईशा फाउंडेशनशी करार केला आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी जग्गी वासूदेव स्वतः सियाचीनमध्ये जवानांना योग प्रशिक्षण देत होते. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, एकाच व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून प्रशिक्षण घ्यावं अशी काही अट नाहीये, असं बीएसएफकडून सांगण्यात आलं. आता बाबा रामदेव यांच्या पतंजलीचा बीएसएफशी कोणताही करार नाही.

बीएसएफचे डीजी के.के. शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, बाबा रामदेव यांनी २०१६ मध्ये ४ हजार जवानांना प्रशिक्षण दिलं, पण आता लष्कर त्यांच्या सेवेचा वापर करत नाही. आता बीएसएफचा बाबा रामदेव यांच्याशी कोणताही करार नाही, आमच्याशी संपर्क करणारे रामदेव पहिले व्यक्ती होते आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा चांगला फायदाही झाला. पण आता आमचा त्यांच्याशी संबंध नाहीये. रामदेव देत असलेल्या सेवेप्रमाणे आम्हीही सेवा देऊ, असे अनेक प्रस्ताव आले होते. पण जग्गी वासूदेव यांचं नाव ठरवण्यात आलं. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान यांच्याकडूनही जवानांना प्रसिक्षण दिलं जात आहे असंही ते म्हणाले. याप्रकरणी पतंजलीची बाजू ऐकण्यासाठी इंडियन एक्सप्रेसने पतंजलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणतही उत्तर आलं नाही.

दोन वर्षांपूर्वी बाबा रामदेव यांनी पतंजली योगपीठात बीएसएफच्या जवानांना योग प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनी बाबा रामदेवांचं प्रशिक्षण घेणाऱ्या बीएसएफ तुकडीला सर्वोत्तम घोषीत कऱण्यात आलं. त्यानंतर बाबांनी पतंजलीवरील आपली पकड आणखी घट्ट केली आणि परिणामी दिल्लीच्या बीएसएफ मुख्यालयात त्यांनी पतंजलीचं स्टोअर सुरू केलं. पण आता चित्र बदललेलं दिसत आहे, रामदेव यांची जागा जग्गी वासूदेव यांनी घेतलीये. बीएसएफ व्यतिरिक्त ईशा फाउंडेशन आता सीआरपीएफ, सीआयएसएफ, कोस्ट गार्डच्या जवानांना योग शिकवत आहे. सियाचीनमध्ये वासूदेव यांनी २५० जवानांना प्रशिक्षण दिलं.