गेल्या काही वर्षभरातच हजारो कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या पतंजली उद्योग समूहाचा भाग असलेल्या पतंजली योगपीठाला आयकरातून सूट मिळणार आहे.  पतंजली योगपीठ ही एक सेवाभावी संस्था आहे. त्यामुळे आयकर लवादाने पतंजली योगपीठाला आयकरातून सूट दिली आहे. आम्ही एक सेवाभावी संस्था आहोत तेव्हा आम्हाला आयकरातून सूट द्यावी असा अर्ज पतंजली योगपीठातर्फे करण्यात आला होता. यावर आयकर लवादामध्ये सुनावणी झाली. आयकर लवादाने पतंजली योगपीठाची बाजू ऐकून घेत त्यांना आयकरातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योगामुळे लोकांच्या वैद्यकीय समस्या सुटतात. तसेच योग हे शिक्षण सुद्धा आहे. वैद्यकीय मदत आणि शिक्षण या दोन्ही बाबींचा प्रसार करणारी एखादी संस्था असेल तर ती सेवाभावी या प्रकारात मोडते असे लवादाने म्हटले त्यामुळे पतंजली योगपीठाला आयकरातून सूट मिळाली आहे.  आयकर कायद्याच्या ११ आणि १२ कलमानुसार पतंजली योगपीठाला आयकरातून सूट देण्यात आली आहे.  आयकर कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि नवा कायदा १ एप्रिल २०१६ मध्ये अंमलात आणण्यात आला. या सुधारणेमध्ये ‘योग’ ही शिक्षण पद्धती असल्यामुळे सेवाभावी प्रकारात येईल अशी सुधारणा करण्यात आली. त्यामुळे पतंजली योगपीठाला आयकर विभागाने सूट दिली.

पतंजली योगपीठाला ४३.९८ कोटींची देणगी मिळाली आहे. या निधीवर कुठलाही कर पतंजली योगपीठ देणार नाही. पतंजली योगपीठामध्ये वानप्रस्थ आश्रम योजनेअंतर्गत ध्यानासाठी छोट्या कुटी बांधण्यास हा निधी देण्यात आला आहे. या देणगीवर कुठलाही कर आकारण्यात येणार नाही. पतंजली उद्योग समूहाची सध्याची वार्षिक उलाढाली ही अंदाजे ५,००० कोटी रुपये इतके आहे. येत्या एक-दोन वर्षांमध्ये ही उलाढाल १०,००० कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे रामदेवबाबांनी जाहीर केले आहे. तसेच पुढील १० वर्षांमध्ये समूहाची उलाढाल ही ५०,००० कोटी होईल असे देखील त्यांनी म्हटले होते. शॅम्पू, टूथपेस्ट, इत्यादी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या पतंजलीने भारतीय बाजारपेठेमध्ये आपले पाय रोवले आहेत. येत्या काळात जीन्सही बाजारात आणण्याचा रामदेवबाबांचा विचार आहे.