04 April 2020

News Flash

आंबेडकरांच्या अर्थविषयक ग्रंथाचा मराठी अनुवाद शासनदरबारी धूळ खात

डॉ. आंबेडकर यांनी विविध विषयांवर विपुल लिखाण केले. ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन’ हा त्यापैकीच एक इंग्रजी ग्रंथ.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती दोनच वर्षांपूर्वी देशभर साजरी होत असताना त्यांच्या अर्थविषयक ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन’ या इंग्रजी ग्रंथाचा ‘रुपयाचा प्रश्न : उद्गम आणि उपाय’ हा मराठी अनुवाद मात्र गेल्या २० वर्षांपासून सरकार दप्तरी धूळ खात पडून आहे. डॉ. विजय कविमंडन यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे.

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यांचे विचारधन लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. डॉ. आंबेडकर यांनी विविध विषयांवर विपुल लिखाण केले. ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन’ हा त्यापैकीच एक इंग्रजी ग्रंथ. तो मराठी भाषकांपर्यंत पोहोचावा म्हणून या ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे काम राज्य सरकारने वर्धा येथील ग्रामीण सेवा महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा.डॉ. विजय कविमंडन यांच्याकडे १९९४ला सोपविले. त्यांनी दोन वर्षे त्यावर काम करून सुमारे ७०० पानांचा अनुवाद केला.

अनुवादाच्या दर्जाबाबत तज्ज्ञांचा समाधानकारक अहवाल १ सप्टेंबर १९९६ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीला सादर करण्यात आला. समितीने तो प्रकाशनासाठी स्वीकारून त्यासाठी प्रा.डॉ. कविमंडन त्यांना २५ मार्च १९९७ला मानधनही मंजूर केले. त्यानंतर २००८ मध्ये डॉ. कविमंडन यांना अंतिम मुद्रितशोधनासाठी या अनुवादाची प्रत पाठवण्यात आली. समितीच्या २२ ऑक्टोबर २००८ रोजीच्या बैठकीत या अनुवादाच्या अंतिम छपाईला मान्यताही देण्यात आली. तसे पत्रही डॉ. कविमंडन यांना देण्यात आले, परंतु अद्याप हा अनुवाद ग्रंथरूपात वाचकांसमोर आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2018 8:05 am

Web Title: babasaheb ambedkar marathi book translation
Next Stories
1 भीम जयंती : मतमतांतरे, समज आणि वास्तव
2 आचार्य अत्र्यांचे बाबासाहेबांवरील ते अजरामर भाषण
3 तत्त्वज्ञ बाबासाहेब!
Just Now!
X