शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते मनोज बाजपेयी, मोहनलाल, समाजसेवक डॉ. अशोक कुकडे, डॉ. स्मिता आणि रवींद्र कोल्हे, तीजनबाई, पत्रकार कुलदीप नय्यर आदी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववंतांना ‘पद्म’ किताब शुक्रवारी जाहीर झाला आहे.

पद्मविभूषण किताबाने चौघांना गौरविले जाणार आहे. यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ‘एल अ‍ॅण्ड टी’ समूहाचे अध्यक्ष अनिल नाईक, पांडवनी शैलीतील पहिली लोकगायिका तीजनबाई आणि युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ‘ऑपरेशन राहत’ या मोहिमेला बळ देणारे तेथील नेते इस्माईल ओमर गुलेह यांचा समावेश आहे.

पद्मभूषण किताबाने १८ जणांचा गौरव केला जाणार आहे. यात दिवंगत पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर, साडेतीनशेहून अधिक मल्याळी चित्रपटांत भूमिका करणारे अभिनेते मोहनलाल, माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक बचेंद्री पाल, प्रख्यात सतार आणि सूरबहार वादक बुद्धादित्य मुखर्जी, लातूरमध्ये ‘विवेकानंद हॉस्पिटल’च्या माध्यमातून आरोग्यसेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणारे डॉ. अशोक लक्ष्मणराव कुकडे, ‘एमडीएच’ मसाले उद्योगाचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी, हरयाणात गरीब मुलांच्या शिक्षणासाठी अविरत कार्य करणारे आणि ‘सरस्वती नदी शोध संस्थान’चे संस्थापक दर्शनलाल जैन, रॉकेटमध्ये द्रवरूप इंधनाचे तंत्रज्ञान भारतात आणणारे अंतराळ संशोधक एस. नाम्बी नारायण, देशाचे माजी महालेखापरीक्षक व्ही. के. शुंग्लु, दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी चळवळीतील नेते प्रवीण गोरधन तसेच सुखदेव सिंग ढिंढसा, कारिया मुंडा, हुकूमदेव नारायण यादव हे राजकीय नेते तसेच अमेरिकेतील उद्योजक जॉन चेम्बर्स यांचा समावेश आहे.

पद्मश्री किताबानेही विविध क्षेत्रांतील ९० गुणवंतांचा गौरव होणार आहे. या पद्मश्रींमध्ये प्रख्यात दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेते आणि पटकथा व संवादलेखक कादर खान (मरणोत्तर), अभिनेता मनोज वाजपेयी, गायक शंकर महादेवन, बुजूर्ग कलावंत दिनयार कॉन्ट्रॅक्टर, अभिनेता-नर्तक आणि दिग्दर्शक प्रभु देवा, तबला वादक स्वपन चौधुरी, जलतरंग वादक राजेश्वर आचार्य, मधुबानी चित्रशैलीचे पुनरूज्जीवन करणाऱ्या गोदावरी दत्त, पहिली किन्नर भरतनाटय़म नर्तिका ठरलेली नर्तकी नटराज, १०० वर्षांचे अमेरिकन योगगुरू ताओ पोचरेन लिन्च, शीखविरोधी दंगलप्रकरणी न्यायालयीन लढा देणारे हरविंदर सिंग फूलका, संस्कृत पंडित महम्मद हनिफ खान शास्त्री, फ्रान्समधील कथ्थक नर्तकी मिलेना साल्विनि, हिमालयातील छायाचित्रकार अनूप साह तसेच क्रिकेटपटु गौतम गंभीर, कब्बड्डीपटु अजय ठाकूर, बुद्धीबळपटु हरिका द्रोणावल्ली, टेबल टेनिसपटु शरथ कमाल, तिरंदाज बोंबायल्या देवी लेशीराम, मल्ल बजरंग पुनिया, महिला बास्केटबॉलपटु प्रशांती सिंग यांचा समावेश आहे.

गेली तीन दशके मेळघाटातील बैरागडसारख्या कुठल्याही सोयी नसलेल्या गावात सेवेचा नवा आदर्श उभा करणाऱ्या डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे या दाम्पत्याला पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे. सिकल सेल संशोधनातील अग्रणी सुदाम काटे, गेल्या ६५ वर्षांत हजारो वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणाऱ्या १०६ वर्षांच्या सालुमारदा थिमक्का, चहाची टपरी चालवून ५० वर्षांच्या आपल्या उत्पन्नातून झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा काढणारे ओदिशाचे देवरापल्ली प्रकाश राव, किसानचाची म्हणून प्रसिद्ध असलेली आणि महिला स्वयंसहाय्यता गट स्थापणारी राजकुमारी देवी यांचाही पद्मश्री किताबाने गौरव होणार आहे.

मी या पुरस्काराच्या योग्यतेचा आहे का, हे मला माहीत नाही. पण सरकारने माझ्या संगीत कारकिर्दीची दखल घेतली, मी ऋणी आहे.    – शंकर महादेवन

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाळ यांचा शोध घेण्यासाठी सबंध आयुष्य वेचलेल्या एका विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे. ज्या शिवचरित्रासाठी मी रानोमाळ हिंडलो, दऱ्याखोऱ्या भटकलो, कागदपत्रे गोळा केली, त्याचे अर्थ लावले त्या प्रदीर्घ अभ्यासाचा हा गौरव आहे. शिवचरित्राचा हा गौरव आहे.  – बाबासाहेब पुरंदरे