दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ६३ जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा दिल्लीत विजयी पताका फडकवली. मात्र निकालांच्या दिवशी दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याबरोबर आणखीन एका व्यक्तीची चर्चा होती. ती व्यक्ती म्हणजे केजरीवाल यांच्यासारखी वेषभुषा करुन आलेल्या लहान मुलाची. याच लहान मुलाला आता थेट अरविंद केजरीवाल यांनी आपल्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिलं आहे. विशेष म्हणजे औपचारिकरित्या आमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये अवघ्या एक वर्षाचा हा छोटू सर्वात लहान वयाचा पाहुणा असणार आहे.

दिल्लीच्या विधानसभा निकालांच्या दिवशी सोशल नेटवर्किंगवर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या फोटोमधील मुलाच्या डोक्यावर आपचा प्रचार करणारी गांधी टोपी, तपकिरी रंगाचे स्वेटर, गळ्याभोवती काळ्या रंगाचे मफलर डोळ्यावर जाड फ्रेमचा चष्मा आणि ओढांवर मिशी काढलेली होती. दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील आपच्या मुख्यालयामध्येही या छोट्या केजरीवालबरोबर फोटो काढण्यासाठी आप समर्थकांची चढाओढ सुरु होती. ‘छोटा केजरीवाल’ असं टोपणनावही या मुलाला देण्यात आलं. आपच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुनही या छोट्या केजरीवालचा फोटो ‘मफलरमॅन’ या कॅप्शनसहीत पोस्ट करण्यात आला होता.

आत आपनेच ट्विटवरुन या छोट्या केजरीवाल खऱ्या केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आल्याची माहिती दिली आहे. “मोठी घोषणा बेबी केजरीवालला १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. तयार हो ज्युनियर!,” असं ट्विट आपने केलं आहे.

आणखी वाचा – …म्हणून केजरीवाल यांच्या शपथविधीस नसणार कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री

कोण आहे हा छोटा केजरीवाल?

आपच्या मुख्यालयाबरोबरच सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरलेल्या या ‘छोट्या केजरीवाल’चे खरं नाव आहे आयन तोमर. अवयान अवघ्या एका वर्षाचा आहे. अवयानचे वडील राहुल तोमर आणि आई मिनाक्षी दोघेही आपचे मोठे समर्थक आहेत. “केवळ मी नाही तर माझे संपूर्ण कुटुंबातील सर्वच सदस्य अरविंद केजरीवाल यांचे चाहते आहेत. आम्ही त्यांच्या विचारांनुसार वागण्याचा आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो,” असं राहुल सांगतात. २०१५ मध्ये केजरीवाल दुसऱ्यांदा विजयी झाले होते त्यावेळी अवयानच्या मोठ्या बहिणीला केजरीवाल यांच्यासारखा पोषाख करुन आपच्या कार्यालयात गेली होती असं राहुल सांगतात. त्यावेळी ती केवळ पाच वर्षांची होती. अवयानला केजरीवाल यांच्यासारख्या लूक देण्यामागे त्याची आई मिनाक्षीचा मोठा हात असल्याचं राहुल सांगतात. “आता आमची मुले लहान आहेत पण त्यांच्या डोक्यात राजकारणाबद्दल एक प्रतिमा तयार होत आहे. मागच्या वेळी माझी मुलगी केजरीवाल यांच्यासारखा पोषाख करुन गेली होती तेव्हा त्यांनी तिचे कौतुक केलं होतं,” असंही राहुल म्हणाले. केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य श्रेत्रात केलेल काम कौतुकास्पद असल्याचंही राहुल म्हणाले.