छत्तीसगडमधील रायपूरमध्ये रुग्णवाहिकेचा दरवाजा बंद झाल्याने गुदमरून एका अडीच महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १०८ क्रमांकावर मोफत सेवा पुरवणाऱ्या रुग्णवाहिकेत हा धक्कादायतक प्रकार घडला. या बाळाच्या वडिलांनी खिडकी फोडून बाळाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ती रुग्णवाहिका सरकारी मालमत्ता असल्याने तुम्ही खिडकीची काच तोडू शतक नाही असे त्यांना सांगण्यात आले. वेळीच मदत न मिळाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत बालकाचे वडील अंबिका कुमार यांनी केला आहे.

हृद्याच्या शस्त्रक्रियेसाठी सत्यसाई रुग्णालयात या बालकाला दाखल करण्यात आले. कुमार आणि त्यांची पत्नी बिहारमधील गया येथून त्यांच्या बाळावर उपचार करण्यासाठी रायपुरला आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर होत चालल्याने रायपूर स्थानकाजवळील डॉ. आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बाळाला हलवण्याचा सल्ला देण्यात आला. डॉक्टरांनी मुलाला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितल्यानंतर कुमार यांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन करुन संजिवनी एक्सप्रेस रुग्णवाहिका सेवा योजनेअंतर्गत चालणाऱ्या रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका बूक केली. काल सकाळच्या सुमारास बाळाला याच रुग्णवाहिकेतून डॉ. आंबेडकर रुग्णालयात नेले. तिथे पोहचल्यानंतर या रुग्णवाहिकेचा दरवाजा जाम झाला. आणि ते बाळ ४० मिनिटे त्या रुग्णवाहिकेत अडकले. अनेक प्रयत्न करुनही तो दरवाजा उघडला जात नव्हता. अखेर खिडकीच्या काचा तोडून त्या बाळाला बाहेर काढण्याचा प्रयत्न कुमार यांनी केला असता रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका सराकारी मालमत्ता असल्याने तुम्ही खिडकी तोडू शकत नाही असे त्यांना सांगितले. अखेर ४० मिनिटांनी अनेक खटाटोप केल्यानंतर हा दरवाजा उघडला तेव्हा बाळ आतमध्ये बेशुद्ध अवस्थेत होते. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.

या घडलेल्या प्रकारासाठी रुग्णवाहिका सेवा पुरवणारी कंपनी दोषी असल्याचा आरोप मृत बालकाच्या पालकांनी केला आहे. मात्र १०८ क्रमांकावरून संजिवनी एक्सप्रेस रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या जीव्हीके ईएमआरआय या कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मृत बालाकांच्या पालकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. आम्हाला सव्वा दहा वाजता कॉल आल्यानंतर अवघ्या तीसऱ्या मिनिटाला गाडी तेथे पोहचली. आणि आमच्या तज्ञांनी बालकांसाठी लागणारी सर्व उपकरणे असणारीच रुग्णवाहिका पाठली होती अशी माहिती जीव्हीके ईएमआरआयचे अधिकारी शिबू कुमार यांनी दिली आहे. रुग्णाला डॉ. अंबेडकर रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णवाहिकेचा दरवाज जाम झाल्याचे शिबू यांनी कबूल केले मात्र अवघ्या काही मिनिटांसाठी तांत्रिक बिघाड घडल्याने बाळ अडकल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी लगेच त्या बाळाला दरवाजा तोडून बाहेर काढले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापुरवीच बाळाचा मृत्यू झाला होता आणि त्यात आमचा काही दोष नसल्याचे शिबू स्पष्ट केले आहे.