भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आणि हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी इस्लामाबादमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असल्याची माहिती ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी दिली. पाकिस्तानात हेरगिरी करत असल्याच्या आरोपांवरुन कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र कुलभूषण जाधव यांच्यावरील सर्व आरोप भारताने फेटाळून लावले होते. जाधव यांना वकीलही उपलब्ध न करुन दिल्यामुळे भारताने याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात हरिश साळवे यांनी भारताकडून कुलभूषण जाधव यांची बाजू मांडली. यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देत, त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील उपलब्ध करुन द्यावा असे निर्देश पाकिस्तानला दिले होते.

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर खान जंजुआ यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या चर्चेच कुलभूषण जाधव यांना माणुसकीच्या आधारावर पाकिस्तानने सोडावं यासाठी चर्चा झाल्याचं समजतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये हरिश साळवे यांनी कुलभूषण जाधवच्या सुटकेविषयी सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.

“कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. कुलभूषण जाधव भारताला परत हवे आहेत, पाकिस्तानने त्यांची माणुसकीच्या आधारावर सुटका करावी यासाठी बोलणी सुरु आहेत. जाधव यांची अटक हा पाकिस्तानासाठी अहंकाराचा मुद्दा होऊन बसला आहे, त्यामुळे याआधी त्यांची सुटका होऊ शकली नाही.” साळवे यांनी माहिती दिली. ३ मार्च २०१६ रोजी कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली.