उत्तर प्रदेशमधील बदाऊन जिल्ह्यातील दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार करून व त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून, या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात सामील असलेल्या दोन पोलीस शिपायांना बडतर्फ केले असून, अन्य एकास अटक करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
१४ व १५ वयोगटातील या मुली २७ मेच्या रात्री बेपत्ता झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे मृतदेह गावातील एका झाडावर लटकवण्यात आल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासही नकार दिला होता. मात्र यावरून परिसरात आंदोलने सुरू होताच उत्तर प्रदेश सरकारने कारवाईस सुरुवात केली. ही कारवाई सुरू असतानाच आझमगड जिल्हय़ातही एका दलित मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले.
बलात्कार व हत्येचे हे प्रकरण घडल्यानंतर पोलिसांनी सुरुवातील फिर्याद नोंदवून घेण्यासही नकार दिला होता. मात्र स्थानिकांनी निदर्शने केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेतली. केंद्रीय गृहमंत्रालयानेही याप्रकरणी राज्याकडून अहवाल मागवला आहे. एकूण सात जणांनी हे निर्घृण कृत्य केल्याचे उघड झाले असून यापैकी एका आरोपीसह छत्रपाल आणि सर्वेश यादव या दोन कॉन्स्टेबलना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून जलदगती न्यायालयात याचा खटला चालवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
केंद्र ‘बलात्कार आपत्ती कक्ष’ स्थापणार
*केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांनी या घटनेचा निषेध करताना पोलिसांची निष्क्रियता याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
*अशा घटनांमध्ये तत्परतेने कारवाई होण्यासाठी ‘बलात्कार आपत्ती कक्ष’ स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. मुलींच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यास ताबडतोब तसे आदेश देण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या.