उत्तर प्रदेशमधील बदायुँ येथे गेल्या वर्षी मे महिन्यात दोन बहिणींच्या मृत्यूची घटना हा आत्महत्येचा प्रकार होता. त्यांचा खून किंवा बलात्कार झाला नसल्याचा निष्कर्ष केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपासात काढला आहे. आता या प्रकरणी बदायुँ न्यायालयात सीबीआय शुक्रवारी अंतिम अहवाल दाखल करण्याची शक्यता आहे.
विविध ४० वैज्ञानिक अहवालांवर आधारीत सीबीआयने तपास पूर्ण केला. या प्रकरणी अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल न करण्याचा निर्णय सीबीआयने यापूर्वीच घेतला आहे. एफआयआरमध्ये खून व बलात्काराचा उल्लेख होता. मात्र ही आत्महत्येची घटना असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद यांनी सांगितले.
 या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता नसल्याचा निष्कर्ष वैद्यकीय मंडळाने काढल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. चाचण्यांसाठी हैदराबादस्थित केंद्राची मदत घेण्यात आली. त्यांनी या घटनेत बलात्काराची शक्यता फेटाळून लावली होती. तसेच मुलींच्या आई-वडिलांनीही परस्परविरोधी जबाब दिले होते. बदायुँ जिल्ह्य़ात मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात १४ व १५ वर्षांच्या या दोन बहिणींचे मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले होते. या घटनेबद्दल देशभर संताप व्यक्त करण्यात आला होता. उत्तर प्रदेश सरकारवरही कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्दय़ावर टीका झाली होती. जूनमध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्याकडे घेतला होता.
कुटुंबीय सर्वोच्च न्यायालयात
सीबीआयने हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्या बहिणींच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी सर्वोच्च न्यायालय तसेच पंतप्रधानांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मुली आत्महत्या करू शकत नाहीत. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हीच आत्महत्या करू असा इशारा यातील एका मुलीच्या वडिलांनी दिला.
मुख्यमंत्र्यांची माध्यमांवर टीका
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणात माध्यमांना जबाबदार धरले आहे. सरकारची एखादी किरकोळ चूक माध्यमे मोठी दाखवतात तर चांगल्या बाबींना प्रसिद्धी देत नाही असा आरोप केला. भाजपवर त्यांनी अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. सरकार विकास कार्यक्रम घेऊन पुढे जात असताना एक पक्ष इतर मुद्दे उपस्थित करत आहे. बदायुँ येथील घटना आता माध्यमांपुढे आहे. त्यांनीच आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही दिला. या प्रकरणी तुम्ही सरकारला बदनाम केलेत अशी टीकाही केली.