फुलराणी म्हणून ओळखली जाणारी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने भाजपात प्रवेश केला आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणाऱ्या सायना नेहवालने भाजपात प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. सायना नेहवालसोबत तिच्या मोठ्या बहिणीनेही यावेळी भाजपात प्रवेश केला. भाजपा कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सायना नेहवालचा भाजपा प्रवेश कार्यक्रम पार पडला. सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सायना नेहवालच्या आधी अनेक खेळाडूंनी भाजपात प्रवेश केला आहे. पैलवान योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायना नेहवालचा जन्म हरियाणाचा असून भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत तिचा समावेश आहेत. सायनाने ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. २०१५ मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. सध्या ती नवव्या क्रमांकावर आहे.

“मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आज देशासाठी चांगलं काम करणाऱ्या पक्षात मी प्रवेश करत आहे. कष्ट करणारे लोक मला आवडतात. नरेंद्र मोदी देशासाठी खूप मेहनत घेतात. नरेंद्र मोदींनी क्रीडा क्षेत्रासाठी खूप काम केलं आहे. त्यामुळे या पक्षाशी जोडलं जाणं मी माझं भाग्य समजते. माझ्यासाठी हे सर्व काही नवं आहे. पण मला राजकारणाबद्दल वाचायला आवडतं. नरेंद्र मोदींकडून मला खूप काही शिकायला मिळतं. देशासाठी काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,” असं सायनाने यावेळी सांगितलं.

२३ मे २०१५ रोजी पटकावला अव्वल क्रमांक
१९ मार्च १९९० रोजी हरियाणामधील हिसार येथे सायनाचा जन्म झाला. २३ मे २०१५ रोजी सायनाने भारताची मान उंचावत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला होता. हे यश मिळवणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू आहे. २०१२ मध्ये सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलं होतं. बॅडमिंटनमध्ये पदकाची कमाई करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली होती.

सायना नेहवालवर बायोपिक
सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही येणार आहे. अमोल गुप्ते या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून फेब्रुवारीत शुटिंग पूर्ण होणार आहे. परिणीती चोप्रा चित्रपटात सायनाची भूमिका निभावताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी आधी श्रद्धा कपूरचं नाव चर्चेत होतं. पण नंतर परिणीतीचं नाव अंतिम करण्यात आलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badminton champion saina nehwal bjp sgy
First published on: 29-01-2020 at 12:30 IST