शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील जनजीवन पूर्णपणे  विस्कळीत झाले आहे. गेल्याच महिन्यात बद्रीनाथ यात्रेला सुरूवात झाली होती, पण शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका या यात्रेला देखील बसला आहे. मुसळधार  पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे  बद्रीनाथकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहे. तसेच यात्रींना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

राजधानी देहराडूनमध्येही पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे, त्यामुळे या भागातील वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर काही गावातील रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

मुसळधार पावसामुळे  अलकनंदा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. इथल्या मंदिरातही पूराचे पाणी शिरले आहे. कैलास, बेगुल आणि सुखी नदीची पातळी देखील पावसामुळे  वाढली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या भागात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने पुढचे ४८ तास उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामन खात्याच्या अंदाजानुसार उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली भागात पुढचे काही तास मुसळधार पाऊस कोसळू शकतो तसेच पुर आणि ढगफुटी होऊ शकते त्यामुळे अतिदक्षतेचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

२०१३ मध्ये जो प्रलय उत्तराखंडने पाहिला तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षेचे उपाय योजले जात आहेत.