X
X

बहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन

READ IN APP

या गणपतीला मागील ४० वर्षांची परंपरा असून मराठी मंडळातर्फे मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने आपल्या गणपती बाप्पांसाठी शिर्डीमधील साईबाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली होती.

गणेशोत्सव देशात मोठ्या उत्साहात साजरा झाला असून साता समुद्रापारही बाप्पांचे तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात स्वागत करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बहरिन येथील महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे येथील बाप्पाचे गणपतीच्या काळात १० ते १२ हजार लोकांनी दर्शन घेतले. या गणपतीला मागील ४० वर्षांची परंपरा असून मराठी मंडळातर्फे मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने आपल्या गणपती बाप्पांसाठी शिर्डीमधील साईबाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली होती.

याठिकाणी असणारे मराठी लोक गणपतीच्या १ महिना आधीपासून तयारी करुन बाप्पासाठी खास डेकोरेशन करतात. ऑफीस, घर आणि इतर गोष्टी सांभाळत डेकोरेशन करणारी ही टीम गणरायाच्या सेवेसाठी हजर असते. या वर्षी या टीमने तयार केलेला देखावा मुंबई पुण्यातील नामांकित देखाव्यांना लाजवेल इतका उत्कृष्ट झाल्याचे मत अनेकांनी नोंदवले. बऱ्याचदा भारताबाहेर गेल्यानंतर तरुण पिढी आपले सण, उत्सव आणि परंपरा विसरून जाते. येथील भारतीयांवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडल्याची ओरड होताना दिसते. मात्र, भारताबाहेर आपल्या परंपरा आणि सण-उत्सव तितक्यात आनंदाने आणि उत्साहात साजरे करण्याचा बहरिन मराठी मंडळाने कायमच प्रयत्न केला.

महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अभिजीत इगावे ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना म्हणाले, महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ दरवर्षी ४० हून अधिक मराठी व अमराठी उत्सव साजरे करते. मंडळाचे स्वतःचे ढोल-ताशा आणि लेझीम याचे पथकही आहे. अखेरच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात गणारायाला भक्तिभावाने निरोपही दिला जातो. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या या गणेश उत्सवात बहरिनमधील फक्त मराठीच नाही तर उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील लोकही मनोभावाने सहभागी होतात. या वर्षी मंडळाने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आकर्षक मूर्ती स्थापन केली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि एकत्र येण्याने आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्यांना घरची उणीव भासू नये हाच यामागील मुख्य उद्देश होता.

23
X