लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील युवकांनी उमेदवारांकडे एक अजब मागणी केली आहे.
हरियाणातील युवक ‘बहु दिलाओ, व्होट पाओ'(पत्नी द्या व मत घ्या) अशी नारेबाजी करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांसमोर युवकांनी ही नारेबाजी केली. हरियाणा राज्यात प्रत्येकी १,००० पुरूषांमागे ८७७ महिला आहेत. राज्यात महिलांची संख्या कमी असल्यामुळे निर्धारित वय होऊनही युवकांचे विवाह होऊ शकलेले नाहीत.
या राज्यातील बीबीपूर गावचे सरंपच सुनील जगलान म्हणतात की, गावातील मुलींचे प्रमाण भरपूर कमी आहे. त्यामुळे गावातील अनेक युवक वय झाले असूनही विवाहापासून वंचित आहेत. त्यामुळे लोकसभा उमेदवारांसमोर गावातील युवकांनीही नारेबाजी करण्याच ठरविले.
इतकेच नव्हे तर, २००९ साली अविवाहीत मुलांनी मिळून ‘कुवारा’ नावाची संघटनाही स्थानप केली. या संघटनेचे अध्यक्ष पवन कुमार यांच्या नेतृत्वाखाली या युवकांनी लोकसभा उमेदवारांसमोर ‘बहु दिलाओ, व्होट पाओ’अशी नारेबाजी केली. तसेच सरकारने केवळ भ्रूण हत्येकडेच लक्ष देऊ नये. बेरोजगारी मुळेही अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे भ्रूणहत्येसोबत बेरोजगारी दूर करण्यावरही सरकारने भर द्यायला हवा. असेही ते म्हणाले.