उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले असतानाच अलाहाबाद जिल्ह्य़ात दूरस्थ ठिकाणी बहुजन समाज पक्षाच्या नेत्याची हत्या करण्यात आली असून त्यामुळे या भागात तणाव वाढला आहे. साठ वष्रे वयाचे महंमद शामी यांना मावइमा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ठिकाणी हल्लेखोरांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ जवळून गोळ्या मारल्या. हे ठिकाण अलाहाबादपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक शलभ माथूर यांनी दिली. या घटनेच्या निषधार्थ बसपासमर्थकांनी अलाहाबाद-प्रतापगड महामार्गावर ठिय्या दिला. त्यात त्यांनी गुन्हेगारांना अटक करून हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी सांगितले, की शामी हे गेल्याच वर्षी बसपात आले होते व पाच वेळा ते मावइमा गटाचे अध्यक्ष निवडले गेले होते. अनेक गुन्हेगारी प्रकरणात त्यांचा हात होता. त्यात खून व दरोडय़ांचा समावेश आहे. पंचायत निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शामी बसपात आले होते व आधी ते बराच काळ समाजवादी पक्षात होते. २००२ मध्ये त्यांनी कुंडा येथून विधानसभेची निवडणूक लढवली होती व त्या वेळी अपक्ष उमेदवार आमदार रघुराज प्रताप सिंग ऊर्फ राजाभया हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते.

राजाभयानंतर अखिलेश यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. शामी यांचे स्थानिक भाजप व विश्व िहदू परिषद नेत्यांशी वाद होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधित ठिकाणी पोलिस कुमक पाठवण्यात आली आहे. बठा सत्याग्रह केल्यानंतर शामी यांचे समर्थक महामार्गावरून पांगले आहेत. गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत व शामी यांच्या कुटुंबीयांनी प्राथमिक माहिती अहवाल म्हणजे एफआयआर दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.