मायावतींची देवेगौडांच्या धजदशी युती, योगी यांच्या ३५ सभा

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मित्रत्वाचे नारे देत भाजपला धूळ चारणाऱ्या सप-बसपमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघात आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या फुलपूर मतदारसंघात भाजपचा पराभव करण्यासाठी सप-बसपने मैत्रीपूर्ण युती केली होती. नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणूकसह उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते.

लोकसभा पोटनिवडणुकी वेळी केलेली युती ही केवळ त्या वेळेपुरतीच होती. अद्याप इतर राज्यांमध्ये एकत्र लढण्याबाबत निर्णय झालेला नाही. परंतु, धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे असे सपला वाटत असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रवक्ता राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

तर बसपच्या नेत्या मायावती यांनी एच डी देवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत युती केली असून त्यांनी म्हैसूर, चित्रदुर्ग मध्ये प्रचारसभा घेतल्या आहेत. तर येत्या ५-६ मे रोजी मराठीबहुल बेळगाव आणि बिदरमध्ये प्रचारसभा घेणार असून संयुक्त जनता दलाच्या पाठिंब्याने कर्नाटकमध्ये २० जागा लढवीत आहेत. सपचे अखिलेश यादव यांच्या सभांबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कर्नाटकमध्ये ३५ सभा, रॅली घेणार आहेत. नाथ संप्रदायाशी संबंधित असलेल्या किनारपट्टीवरील जिल्ह्य़ांमध्ये त्यांच्या प्रामुख्याने सभा होणार आहेत.