शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे परिवहनमंत्री मदन मित्रा यांचा जामीन अर्ज गुरुवारी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शारदा समूहाच्या कार्यक्रमाला हजर होत्या, असा युक्तिवाद मित्रा यांच्या वकिलांनी या वेळी केला. प्रभारी जिल्हा आणि सत्र न्यायमूर्ती लक्ष्मीकांत यांनी जामीन अर्ज फेटाळला.
शारदा कंपनीच्या मालकीच्या ‘कलम’ या वृत्तपत्राच्या उद्घाटनाला ममता बॅनर्जी हजर होत्या. यासह अन्य तीन मुद्दय़ांमुळे आपण शारदा समूहावर विश्वास ठेवला, असे एका साक्षीदाराने शपथपत्रावर सांगितले, असे मित्रा यांचे वकील मिलन मुखर्जी म्हणाले.
मदन मित्रा हे शारदा समूहाच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, हे समजल्यामुळे आपण आकर्षित झालो, असे अश्रफ अली नावाच्या साक्षीदाराने सांगितले. त्याचप्रमाणे स्थानिक खासदार अबू हसीम खान यांनीही शारदा समूहाची स्तुती केली होती. त्यामुळे आपण तेथे गुंतवणूक केली, असे अली यांचे म्हणणे असल्याचा युक्तिवाद मुखर्जी यांनी केला. साक्षीदाराने तीन राजकीय नेत्यांची नावे घेतली असल्याने मित्रा यांना अटकेत का ठेवण्यात येत आहे, त्यांना बळीचा बकरा का करण्यात येत आहे, असा सवाल मुखर्जी यांनी केला. मित्रा गेल्या १९५ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत त्यामुळे ते कोणावरही दबाव आणू शकणार नाहीत, असे मुखर्जी म्हणाले. मात्र मित्रा हे अद्यापही मंत्री असल्याने ते कोणावरही दबाव आणू शकतात, असे सीबीआयचे वकील म्हणाले.