स्वयंघोषित संत आसाराम बापू यांची जामीन याचिका राजस्थानमधील उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. या निकालामुळे आसाराम बापूंना जोधपूरमधील तुरुंगातच राहावे लागणार आहे. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू यांना जोधपूर पोलिसांनी इंदूरमधून अटक केली. गेल्या महिन्याभरापासून आसाराम बापू जोधपूरमधील तुरुंगात आहेत. आसाराम बापूंना आत्ता जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
न्या. निर्मल जीत कौर यांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद दीड तास ऐकून घेतल्यानंतर हा निकाल दिला. याआधी १६ आणि १८ सप्टेंबर रोजी न्यायालयाने सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. त्यानंतरही बचाव पक्षाचे वकील राम जेठमलानी यांनी आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ काही कागदपत्रे द्यायची असल्यामुळे न्यायालयाकडे वेळ मागितला होता. मंगळवारी त्यांनी चार वेगवेगळी प्रतिज्ञापत्रे दाखल केली. त्यामध्ये संबंधित अल्पवयीन मुलीला गुरुकुलमध्ये राहायचे नव्हते, अल्पवयीन मुलीचे वयाचे प्रमाणपत्र चुकीचे आहे, संबंधित मुलगी मनोरुग्ण आहे आणि तिचे एका मुलाबरोबर प्रेमप्रकरण होते, याचा समावेश आहे. न्यायालयाने आपला निकाल देताना या प्रतिज्ञापत्रांचा विचार केला नाही.