मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. पात्रा यांनी प्रचारादरम्यान रस्त्यावरच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यासाठी भोपाळमधील कोर्टाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. संबित पात्रा आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एस. एस. उप्पल यांच्याविरोधात भुवनेश्वर मिश्र यांच्यावतीने अॅड. यावर खान यांनी कोर्टात तक्रार याचिका दाखल केली होती. न्या. प्रकाशकुमार उइके यांनी पात्रा यांच्याविरोधात हे वॉरंट जारी केले आहे.


तक्रारीनुसार, संबित पात्रा यांनी २७ ऑक्टोबर रोजी भोपाळच्या एमपी नगरमध्ये विशाल मेगा मार्टजवळ रास्ता रोको करुन आणि तंबू-खुर्च्या टाकून वाहतुकीचा मार्ग रोखला होता. त्याचबरोबर परवानगीशिवाय पत्रकार परिषद घेऊन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. याविरोधात निवडणूक आयुक्त कार्यालय आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती.

त्यानंतर कोर्टाने एमपी नगर पोलीसांना संबित पात्रा आणि एस. एस. उप्पल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, उप्पल यांनी कोर्टात हजेरी लावून २६ डिसेंबर रोजी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र, कोर्टात हजेरी न लावल्याबद्दल कोर्टाने संबित पात्रा यांच्याविरोधात वॉरंट जारी केले.