एका अब्रुनुकसानीच्या खटल्यासंदर्भात काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी सुनावणीसाठी गैरहजेरी लावल्याने दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढले आहे. भाजपा नेते राजीव बब्बर यांनी त्यांच्याविरोधात तक्रार याचिका दाखल केली आहे. थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांना शिवलिंगावर विंचू असे संबोधले होते.

यापूर्वी कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार थरुर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा आरोप निश्चित करण्याप्रकरणी सात ऑगस्ट रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. कोर्टात शरुर यांचे वकील सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते की, बब्बर हे या प्रकरणात पीडित नाहीत त्यामुळे त्यांची तक्रार सुनावणी योग्य नाही. कारण, कथित टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याबाबत करण्यात आली होती.

भाजपा नेते बब्बर यांनी तक्रार दाखल करीत आरोप लावला होता की, थरुर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये बंगळूरूमध्ये आयोजित कार्यक्रमात एका लेखाच्या हवाल्याने म्हटले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या एका विंचवाप्रमाणे आहेत.

या वादग्रस्त लेखामध्ये लेखकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हवाल्याने म्हटले होते की, मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवाप्रमाणे आहेत. त्यांना इथून कुठल्याही प्रकारे हटवले जाऊ शकत नाही. भाजपा नेते बब्बर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, थरुर यांनी या लेखाच्या आधारावर वादग्रस्त विधान केले होते.