News Flash

“तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचा आलेखच खाली आणला”; राजीव बजाज यांचा केंद्र सरकारवर निशाणा

भारतासारखा लॉकडाउन कुठेच नाही, बजाज यांची केंद्रावर टीका

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारतातील अनेक तज्ज्ञ व्यक्ती आणि उद्योगपतींशी संवाद साधत आहे. दरम्यान, गुरूवारी त्यांनी देशातील उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला. या चर्चेदरम्यान बजाज यांनी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवरही टीका केली. “तुम्ही करोनाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणला,” असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“भारतानं शेजाऱ्यांकडून शिकण्याऐवजी पाश्चिमात्यांच अनुकरण केलं. त्यांची भौगोलिक स्थिती, अन्य परिस्थिती आणि तापमान यांसारख्या गोष्टी निराळ्या आहे. आपण कठोर लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसं करता आलं नाही. यामुळे मात्र अर्थव्यवस्थेवर मात्र मोठा परिणाम झाला. करोनाच्या आलेखाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आला,” असं म्हणत बजाज यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“भारताला जपान किंवा स्वीडनप्रमाणे पाऊल उचलणं अपेक्षित होतं. ते हर्ड इम्युनिटीच्या मार्गावर पुढे गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी ज्या लोकांना करोनाचा धोका अधिक होता त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं. याचा अर्थ असा आहे की सॅनिटायझेशन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं असा होता. आपल्याकडे दुर्देवानं पूर्ण लॉकडाउन राबवलाच गेला नाही,” असं ते म्हणाले.

भारतासारखा लॉकडाउन कुठेच नाही

भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला बजाज यांनी ड्रॅकोनिअन असं संबोधलं. “आपण लागू केला तसा लॉकडाउन जगात कुठेही नव्हता. अशा प्रकारचा लॉकडाउन मी ऐकलाही नव्हता. अन्य देशांमध्ये लोकांना बाहेर पडण्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी तसंच कोणालाही भेटायला जाण्याची परवानगी होती. परंतु आपल्याकडे बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून मारहण करण्यात आली. त्यांचा अपमान करण्यात आला. इतकंच काय तर ज्येष्ठ नागरिकांनाही सोडलं नाही,” असं बजाज म्हणाले.

मास्क नसेल तर…

“भारतात सर्वाधिक मृत्यू हे रस्ता दुर्घटनेत होत असतात. कारण कोणतंही असू शकतं. जर एखादी व्यक्ती हेलमेटशिवाय गाडी चालवत असेल तर ९९.९ टक्के वेळा पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. परंतु एखाद्यानं मास्क घातला नसेल किंवा कोणी वॉकवर निघालं असेल तर त्यांना पोलिसांकडून मारहाण केली जाते. त्यांना अपमानित केलं जातं. रस्त्यावर उठाबशा काढायला लावलं जातं. अनेकदा तर त्यांच्या हाती मी देशद्रोही आहे असे बोर्डही दिले गेले. रस्त्यावर बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मारहाण होत असल्याचं मी पाहिलं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

थेट मदत पोहोचवणं आवश्यक

सरकारनं अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाटी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. यावरही बजाज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जगभरातील ज्या देशांच्या सरकारनं करोनाचा सामना करण्यासाठी पॅकेजची घोषणा केली त्याच्या दोन तृतीयांश हिस्सा हा संघटना किंवा थेट लोकांपर्यंत पोहोचला. तर भारतात तो केवळ १० टक्के लोकांपर्यंतच पोहोचला. लोकांपर्यंत थेट पैसे का पोहोचवण्यात आले नाहीत?,” असा सवालही त्यांनी केला.


पॉझ बटनानंतर परिस्थिती पूर्वपदावर – राहुल गांधी

या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनीदेखील केंद्र सरकारवर निशाणा साधला. “हा लॉकडाउन अयशस्वी झाला आहे. जगातील हा एकमेव असा लॉकडाउन असेल ज्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. भारतानं दोन महिन्यांसाठी पॉझ बटन दाबलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येत आहे,” असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 2:02 pm

Web Title: bajaj auto managing director rajeev bajaj criticize central government coronavirus lockdown congress rahul gandhi webinar jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “नोव्हेंबरमध्येच भारतात करोनाने केला होता प्रवेश”; शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा
2 महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; अमेरिकेनं मागितली माफी
3 चीनमध्ये शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांवर चाकूहल्ला, ४० हून अधिक जखमी; तिघे गंभीर
Just Now!
X