भारताच्या ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेची आठवण जपणारी ‘बजाज’ची बहुप्रतिक्षीत ‘व्ही-१५’ ही बाईक दाखल झाली असून दिल्लीतील ‘ऑटो एक्सपो’मध्ये या बाईकला चांगली पसंती दिली जात आहे. ‘बजाज’च्या ‘व्ही’ श्रेणीतील या पहिल्या मॉडेलला आकर्षक लूक देण्यात आला आहे.  विक्रांतच्या अद्याक्षरातील ‘व्ही’ चे बोधचिन्ह बाईकवर आहे. एलईडी टेल लाईटसह बाईकची सीट देखील कल्पकतेने साकारण्यात आली आहे. बाईकच्या मागच्या सीटवर पॅनल बसविण्यात आले असून ते गरजेनुसार काढता अथवा बसवता येते. ‘व्ही-१५’ ही बाईक सुरूवातील काळ्या आणि पांढऱया या दोन रंगात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘बजाज’ने प्रजासत्ताक दिनी राष्ट्रप्रेमाला साद घालणाऱया जाहिरातीच्या माध्यमातून या बाईकची लक्षवेधक जाहिरात प्रसिद्ध केली होती.  ‘व्ही-१५’ बाईक ‘आयएनएस विक्रांत’च्या धातूपासून तयार करण्यात आल्याचा दावा जाहिरातीत करण्यात आला होता. तेव्हापासून या बाईकबाबत अनेकांमध्ये उत्सुकता होती. बाईकच्या किमतीबाबतची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही.