काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांना अलिंगन दिल्यामुळे सुरू झालेला वाद शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता या वादात बजरंग दलाने उडी घेतली असून सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस बजरंग दलाने जाहीर केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून बजरंग दलाचा आग्रा जिल्हाध्यक्ष संजय जाट याने सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे इनाम देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. या व्हिडिओत जाट हा ५ लाखांचा चेक दाखवताना दिसतो.

सिद्धू हे विश्वासघातकी आहेत. त्यांचे कृत्य माफ करण्यासारखे नाही. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. गुरू गोविंद सिंग यांची शिकवण सिद्धू विसरले आहेत असे वाटते. जो आमच्या जवानांच्या मृत्यूस जबाबदार आहे, अशा शत्रू राष्ट्राच्या लष्कर प्रमुखाला ते अलिंगण कसे देऊ शकतात, असे जाट याने व्हिडिओत म्हटले आहे. सिद्धूंकडून पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना अलिंगन दिल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वांना सिद्धू यांना धडा मिळावा असे वाटत आहे. ज्यांनी देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी आपल्या मुलाला गमावले आहे. अशा कुटुंबीयांना सिद्धूंच्या या कृत्यामुळे धक्का बसला आहे. लोक सिद्धूंच्या विश्वासघातकीपणाला कधीच माफ करणार नाहीत.

आग्रामध्ये सिद्धू यांना येण्यास बंदी असल्याचेही जाट याने म्हटले आहे. जर सिद्धू कधी आग्रा येथे आले तर चपलांनी त्यांचे स्वागत केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच सिद्धू यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी केली. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली होती.