प्लास्टिक पिशवी देण्यास नकार दिल्याने ४५ वर्षीय बेकरी कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीत हा प्रकार घडला आहे. कर्मचाऱ्याने प्लास्टिक पिशवी देण्यास नकार दिला असता ग्राहकाने वीट डोक्यात घालून गंभीर जखमी केलं. हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पीडित कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, खलील अहमद दयालपूर परिसरातील बेकरीत काम करत होते. १५ ऑक्टोबर रोजी बेकरीत आलेल्या एका ग्राहकाने त्यांच्याकडे प्लास्टिक पिशवी मागितली असता त्यांनी नकार दिला.

आरोपीची ओळख पटली असून फैजान अमहद असं त्याचं नाव आहे. २४ वर्षीय फैजान घटनेनंतर फरार आहे. प्लास्टिक पिशवी नाकारल्यानंतर फैजान याची खलील यांच्यासोबत वादावादी झाली. याच वादात फैजानने वीट उचलली आणि खलील यांच्या डोक्यात घातली. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असल्या कारणाने बेकरीने त्यांचा वापर करणं थांबवलं होतं. यामुळेच खलील यांनी फैजानला प्लास्टिक पिशवी नसल्याचं सांगत देण्यास नकार दिला होता.

याप्रकरणी एफआयआर दाखल झाला असून फैजान खान घटनेनंतर फरार आहे. दरम्यान खलील अहमद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपास सुरु आहे.