पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या एअर स्ट्राइकच्या प्लानिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे रॉ चे अधिकारी सामंत गोयल यांची आता रॉ च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एअर स्ट्राइकच्या ऑपरेशननंतर तीन महिन्यात गोयल यांची एजन्सीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल हे १९८४ च्या पंजाब केडरचे अधिकारी आहेत. ९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद शिखरावर होता. त्यावेळी हा दहशतवाद संपवण्यात सामंत गोयल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दुबई आणि लंडनमध्ये सुद्धा त्यांनी सेवा बजावली आहे.

सामंत गोयल अनिल कुमार धसमाना यांची जागा घेतली. अडीचवर्षाच्या शानदार सेवेनंतर धसमाना निवृत्त होत आहेत. सामंत गोयल सध्या रॉ च्या ऑपरेशन्स विभागाची जबाबदारी संभाळत आहेत. बालाकोट एअर स्ट्राइक आणि उरी हल्ल्यानंतर २०१६ साली करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या आखणीमध्ये सामंत गोयल यांची भूमिका महत्वाची होती. सामंत गोयल यांना रॉ मध्ये पाकिस्तानच्या विषयाचे तज्ञ समजले जाते.

अरविंद कुमार यांची इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी गृहमंत्रालयाने फाईलवर स्वाक्षरी केली असून पंतप्रधान कार्यालयाला ही फाईल पाठवण्यात आली आहे. पीएमओमधी वरिष्ठ अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला ही माहिती दिली. ३० जूनला दोन्ही अधिकारी पदभार संभाळतील. गोयल आणि कुमार दोघेही १९८४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.