पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने युद्धसरावामध्ये व्यस्त असलेल्या नौदलाच्या युद्धनौकांची तात्काळ पाकिस्तानच्या समुद्र सीमेजवळ तैनाती केली होती. यामध्ये अत्याधुनिक जहाजांसह अण्वस्त्र पाणबुडीचाही समावेश होता. भारताने उचलेल्या या आक्रमक पावलामुळे भारत नौदलाच्या मदतीने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा बदला घेणार असे पाकिस्तानला वाटले होते. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांचे पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींवर बारीक लक्ष होते. इंडियन एअर फोर्सने बालाकोटमध्ये जैशच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानची अत्याधुनिक अगोस्टा वर्गातील पीएनएस साद पाणबुडी पाकिस्तानी समुद्रातून गायब झाली होती असे वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले. पीएनएस साद पाकिस्तानी पाण्यातून एकाएकी गायब झाल्यानंतर भारतीय नौदलाने तात्काळ या पाणबुडीचा शोध सुरु केला होता.

कराचीच्या समुद्रातून पीएनएस साद गायब झाली होती. कराचीपासून गुजरातपर्यंत यायला या पाणबुडीला तीन दिवस पुरेसे होते तर नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय असलेल्या मुंबईपर्यंत येण्यासाठी या पाणबुडीला पाच दिवस लागले असते. एकाएकी या पाणबुडीचे गायब होणे ही भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक बाब होती असे सूत्रांनी सांगितले.

या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि विमानांची मदत घेण्यात आली. पी-८आय या पाणबुडीचा वेध घेणाऱ्या विमानांचा वापर करण्यात आला. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. पीएनएस साद भारताच्या सागरी हद्दीत आली तर कशा पद्धतीने कारवाई करायची त्या सर्व आवश्यक उपायोजना नौदलाने करुन ठेवल्या होत्या.

पीएनएस साद भारतीय सागरी हद्दीत आल्यास सागराच्या पुष्ठभागावर येण्यासाठी या पाणबुडीला भाग पाडले असते किंवा गरज पडल्यास जलसमाधी देण्याचीही तयारी होती असे सूत्रांनी सांगितले. अखेर २१ दिवसाच्या शोध मोहिमेनंतर पाकिस्तानच्या पश्चिमेला समुद्रात पीएनएस साद पाणबुडीचा शोध लागला.