करोना व्हायरसचा देशातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी यांनी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घेतला आहे. या महामारीला मात देण्यासाठी सरकार, प्रशासन आणि नागरिकांकडून प्रयत्न केले जात आहे. मोदी यांनी केलेल्या आवाहनाला रविवारी देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. करोनाचा अंधार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील नागरिकांनी रविवारी रात्री नऊ वाजता दिवे पेटवत एकतेचा संदेश दिला. मात्र दुसरीकडे कोरोनाला पळवून लावण्यासाठी उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या एका महिला जिल्हाध्यक्षांनी थेट हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेटवर्क १८ च्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील बलरामपूरच्या भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजू तिवारी यांनी कोरोनाला पळवण्याासाठी बंदूकीमधून हवेत गोळीबार केला. त्या इतक्यावर थांबल्या नाहीत तर त्यांनी या प्रकाराचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला. या प्रकारामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी टीकेची झोड उडवली. त्यानंतर मंजू तिवारी यांनी फेसबुकवरून हा व्हिडीओ डिलीट केला. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला आहे.


उत्तर प्रदेशमधील बलरामपूरच्या भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजू तिवारी यांनी दीप प्रज्वलवीत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पाठींबा दर्शवला. दिवे लावून झाल्यानंतर तिवारी यांनी करोनाला पळवण्यासाठी आपल्या लायसन्सच्या बंदूकीतून हवेत गोळीबार केला. अशा पद्धतीनं हवेत गोळीबार केल्याप्रकरणी त्यांच्यावर पक्ष आणि पोलीस कारवाई करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.