कोझीकोड, केरळ : केरळात बालुसरी येथील रुग्णालयातील परिचारिका व चार डॉक्टरांना आजपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे. निपा विषाणूची बाधा झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हा आदेश देण्यात आला. या विषाणूने केरळच्या उत्तरेकडील जिल्ह्य़ांमध्ये सोळा बळी घेतले आहेत. दोन दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर तालुका रुग्णालयात उपचार करण्यात येत होते नंतर त्यांना कोझीकोड वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, की बालुसेरी रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांना रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे कारण ते रुग्णांच्या संपर्कात होते. त्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. रेसिन (२५) यांचा बालुसरी रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर मृत्यू झाला. निखिल याच्यावर उपचार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की अनेक कार्यालयांनी संस्था बंद करण्याची परवानगी मागितली आहे. लोकांची एका ठिकाणी गर्दी होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. कोझीकोडचे जिल्हाधिकारी यू. व्ही. जोस यांनी केरळ उच्च न्यायालयात निपा विषाणूच्या संसर्गाबाबत अहवाल सादर करण्याचे ठरवले आहे. या अहवालास अंतिम रूप देणे सुरू आहे. कोझीकोड जिल्हा न्यायालय संकुलातील अधीक्षकांचा निपाने मृत्यू झाल्यानंतर जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा न्यायालयाचे कामकाज बंद करण्याची विनंती केली आहे. निपा विषाणूमुळे कोझीकोड व मल्लापुरम येथे शाळा उन्हाळी सुटीनंतर सुरू झाल्या नाहीत, त्या ५ जूनपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, राज्यात निपा विषाणूबाबत सतर्कता जारी करण्यात आली असून कोझीकोड मेडिकल कॉलेजच्या कॅज्युलटी, सीटीस्कॅन व वेटिंग रूम या भागात १४ मे रोजी भेट दिलेल्यांनी निपा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १८ मे रोजीही काही जण बालुसेरी तालुका रुग्णालयात आले असतील, तर त्यांनाही संपर्क साधण्याचे आवाहन केले आहेत. आतापर्यंत एकूण १९६ नमुने आले असून १८ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विषाणूंनी १६  बळी घेतले आहेत.