भारतीय इंटरनेट प्रणालीवर सध्या स्पॅम हल्ला झालेला असून त्यात सर्च इंजिन विनंत्या हॅक केल्या जातात. त्यामुळे ब्राउजिंगचा वेग कमी होतो व संशयित संकेतस्थळे खुली होतात. देशातील प्रमुख संगणक सुरक्षा संस्थेने याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
ट्रोजन व्हायरस बामिटाल हा देशातील इंटरनेट प्रणालीत आढळून आला असल्याचे कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम या संस्थेने म्हटले आहे. ट्रोजन बामिटाल वेगाने पसरत असून तो सर्च निकाल सुधारित करतो व भलत्याच जाहिरातींच्या लिंककडे घेऊन जातो.
बामिटाल हे मालवेअर असून त्याचा उद्देश सर्च इंजिन हायजॅक करणे हा आहे. सर्च निकालावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यांला हल्लेखोराने नियंत्रित केलेल्या कमांड अँड कंट्रोल सव्‍‌र्हरकडे म्हणजे बामिटाल सव्‍‌र्हरकडे नेले जाते. ते बामिटाल सव्‍‌र्हर तुम्हाला जाहिरातींच्या सव्‍‌र्हरशी जोडतात व हल्लेखोराच्या पर्यायानुसार असलेल्या संकेतस्थळाकडे घेऊन जातात. वापरकर्त्यांशी कुठलाही संबंध न ठेवता जाहिरातींवर क्लिक करण्याची क्षमता या मालवेअरमध्ये आहे. त्यातून आणखी मालवेअरचा संसर्ग संगणकाला होऊ शकतो. बामिटालमुळे ब्राउजरचा वेग कमी होतो व यजमान वापरकर्त्यांच्या फाइलमध्ये सुधारणा होऊन सुरक्षा संकेतस्थळाकडे जाण्यासही विलंब केला जातो. या मालवेअरचा मुकाबला करण्यासाठी तुम्हाला विश्वासार्ह अशा अँटीव्हायरसचा वापर करावा लागतो. अँटी व्हायरस, अँटी स्पायवेअर डेस्कटॉपवर ठेवावे, फायरवॉल चालू ठेवावी, इमेल उघडताना सावधगिरी बाळगावी असा सल्ला देण्यात आला आहे.