20 November 2017

News Flash

माहिती तंत्रज्ञानाचा महामार्ग बनविण्यात भारत महासत्ता!

आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये भारताचा वाटा महत्त्वपूर्ण आहेच, पण याशिवाय माहिती तंत्रज्ञानाचा महामार्ग बनविण्यामध्ये भारत

पी.टी.आय., संयुक्त राष्ट्रे | Updated: November 29, 2012 6:10 AM

आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये भारताचा वाटा महत्त्वपूर्ण आहेच, पण याशिवाय माहिती तंत्रज्ञानाचा महामार्ग बनविण्यामध्ये भारत महासत्ता बनल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी स्पष्ट केले. स्वदेशी बनावटीच्या आणि अत्यंत कमी किमतीच्या  ‘आकाश-२’ या टॅबलेट पीसीचे अनावरण संयुक्त राष्ट्रांमध्ये करण्यात आले. याप्रसंगी तंत्रज्ञानात घेतलेल्या आघाडीबद्दल मून यांनी भारताचे कौतुक केले.  डाटाविंड या आकाशच्या निर्मात्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष सुनीत सिंग टुली यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये आकाश-२  मून यांना भेट दिला. आकाराने लहान आणि हाताळण्यास सोपा असल्याचा अभिप्राय त्यांनी तात्काळ व्यक्त केला.
तरुणांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आकाशची निर्मिती करण्यात आली असून, आकाशमुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करता येणे शक्य होईल. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र ही आर्थिक विकासासाठी पोषक असून त्यामुळे लोकांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडून येत असतो. दळणवळण, व्यापार यांच्यातील भरभराट, आरोग्य आणि शिक्षण यांच्यातील प्रगती ही तंत्रज्ञान विकासावर अवलंबून असते. डीजिटल क्रांतीपासून अद्याप अनभिज्ञ असलेल्या लोकांना या प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यासाठी दूर्गम भागातील लहान मुले आणि तरुणांपर्यंत माहिती तंत्रज्ञान पोहोचविणे आवश्यक आहे. आकाशमुळे या गोष्टी साध्य होऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चिनी बनाटीच्या चर्चेला विराम
४० डॉलर इतक्या कमी किमतीमध्ये टॅबलेट पीसी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले असतानाच, त्यातील घटक चीनमधून आयात केलेले असल्याबद्दल या आठवडय़ात चर्चा सुरू झाली होती. या टॅबलेटमधील मदरबोर्ड हा चीनमधून आयात करण्यात आला असून त्याची अंतिम जुळवणी व प्रोग्रॅम नोंदणी भारतात होत असल्यामुळे तो ‘मेड इन इंडिया’ की ‘मेड इन चायना’, असा नवा वाद निर्माण झाला होता. मात्र डाटाविंड या टॅबलेट निर्मात्या कंपनीचे अध्यक्ष सुनित टुली यांनी या वादावर पडदा पाडला. जगातील सर्वात कमी किंमतीच्या टॅबलेट पीसीमधील काही घटक आयात करण्यात आले आहेत म्हणून तो भारताचा नसल्याचा प्रचार चुकीचा आहे. आकाशमधील अनेक घटक जगातील वेगवेगळ्या भागांतून आयात करण्यात आले आहेत. मदरबोर्ड आणि किट चीनमधून, टचस्क्रीन कॅनडामधून आणले आहे. तरीही आकाशच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंत तो पूर्णपणे भारतीय आविष्कार आहे, असे त्यांनी नमूद केले.

First Published on November 29, 2012 6:10 am

Web Title: ban ki moon launches aakash 2 at un