चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 59 चिनी मोबाइल Apps भारतात बॅन केले. गलवान खोऱ्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी अ‍ॅप्सवर बंदीची मागणी केली जात होती.

सरकारच्या या निर्णयावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी, केंद्र सरकारने हे पाऊल उशीरा उचललं असं म्हटलं आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, 59 चिनी अ‍ॅप्सवर घातलेल्या बंदीबाबत प्रतिक्रिया देताना  “मला वाटतं सरकारने हे पाऊल उचलायला उशीर केला, कारण या अ‍ॅप्सचा संसर्ग आधीच झाला आहे” असं हेमंत सोरेन म्हणाले.

(CamScanner, टिकटॉकवरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट)

आणखी वाचा- भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

दरम्यान, वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत आहे. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.