साठेबाजी, काळ्याबाजारास आळा घालण्याच्या राज्यांना सूचना

वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीरच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाल्याने केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर रविवारी बंदी घातली. या इंजेक्शनची साठेबाजी आणि काळ्याबाजाराला आळा घालण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत.

देशातील करोना परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत रेमडेसिवीर हे इंजेक्शन आणि त्यात वापरण्यात येणाऱ्या सर्व औषधी घटकांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

करोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे हे औषध रुग्ण आणि रुग्णालयांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी सर्व उत्पादकांनी त्यांचे साठवणूकदार आणि वितरक यांच्याबाबतचा तपशील आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.  औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना औषध साठ्याची पडताळणी, गैरप्रकारांची तपासणी करण्याचे तसेच साठेबाजी आणि काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी प्रभावी कारावाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांनी औषध निरीक्षकांसह परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. देशात सध्या ११ लाख आठ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचाराधीन रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. परिणामी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या औषधाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

गिलीयड सायन्सेस या अमेरिकी कंपनीशी केलेल्या ऐच्छिक करारानुसार सात भारतीय कंपन्या रेमडेसिवीरचे उत्पादन करीत आहेत. दरमहा ३८ लाख ८० हजार इंजेक्शन उत्पादन करण्याची त्यांची क्षमता आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

राज्यात दिवसभरात ६३,२९४ रुग्ण

’राज्यात रविवारी करोनाचे ६३,२९४ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंतचा दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. याच काळात ३४९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

’शनिवारी राज्यातील रुग्णसंख्या किं चित घटली होती. परंतु रविवारी पुन्हा रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

’राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर गेली. सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात उपचार घेत आहेत.

देशात दीड लाख  नवे करोनाबाधित

देशात रविवारी करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे १,५२,८७९ रुग्ण आढळले, तर ८३९ जणांचा मृत्यू झाला. देशातील उपचाराधीन रुग्णसंख्येने पहिल्यांदाच ११ लाखांचा टप्पा ओलांडला.