केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या अशा सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून देशात मोठं राजकारण सुरू झालं आहे. करोनाच्या काळातही या प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्याची मंजुरी देण्यात आल्याने विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकल्पावर खर्च करण्यात येणारा पैसा हा लोकांच्या आरोग्य व्यवस्थेसाठीच्या खर्च करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील लोकांनी करोनाकाळात सुरु असलेल्या या प्रकल्पाच्या कामावरून संताप व्यक्त केला आहे. प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणाचा आणि स्मशानातील जळणाऱ्या मृतदेहांचा फोटो एकत्र करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. आता सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामाचे फोटो काढण्यावर बंदी आणण्यात आली आहे. यासंबंधीत पोस्टर कामाच्या ठिकाणी लावण्यात आलं असे काँग्रेसने म्हंटले आहे.

सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या असून काही पोस्टर लावण्यात आले आहेत. यावर अति सुरक्षित प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे म्हणत प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच फक्त कामगारांनाच आतमध्ये प्रवेश असल्याचे त्यावर लिहिले आहे. पोस्टरवर लिहिलेल्या माहितीनुसार प्रोजेक्ट इंजार्चच्या परवानगीने आतमध्ये जाता येणार आहे.

यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी हे फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. “आपदाजीवी जी, आपले पंतप्रधान निवास आणि १३,४५० कोटींचा राजमहल म्हणजे सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यावर बंदी का? काय सत्य आहे जे लपवता आहात?” असे सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या प्रकल्पावर काँग्रेससोबत शिवसेनेने देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात हे काम थांबण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने हे काम थांबवले नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणात करोनाचा पसरु शकतो असे म्हंटले आहे.