विद्यार्थी संघटनेच्या निमंत्रणावरून वाद
भाजपचे वादग्रस्त खासदार योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या मते या कार्यक्रमाला परवानगी घेण्यात आलेली नव्हती. गोरखपूरचे खासदार आदित्यनाथ यांना मिर्झापूरकडे जात असताना विंध्याचल येथेच अडवण्यात आले. काही विद्यार्थी संघटनांचा आदित्यनाथ यांना बोलावण्यास विरोध असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
अलाहाबादचे जिल्हा दंडाधिकारी संजयकुमार व वरिष्ठ पोलीस अधीक्षक इम्यॅनुअल यांनी सांगितले की, आदित्यनाथ यांना जिल्ह्य़ात जाऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. विद्यार्थी संघटनेला त्या कार्यक्रमासाठी परवानगी दिली नव्हती, तसेच विद्यापीठानेही त्यांना कार्यक्रम घेऊ देऊ नये, असा आदेश दिला होता. दरम्यान, विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा रिचा सिंह यांनी सांगितले की, आदित्यनाथ यांच्या भेटीला माझा विरोध आहे व ते आले तर उपोषण सुरू करू. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत माझे नाव लिहू नये, असा आग्रहही मी धरला. रिचा ही स्वातंत्र्यानंतर प्रथमच विद्यार्थी संघटनेची महिला अध्यक्ष असून अपक्ष निवडून आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 21, 2015 6:33 am