ऑनर किलिंग किंवा प्रतिष्ठेसाठी हत्या या संज्ञेवरच बंदी घालण्यात यावी आणि ‘caste-based murders’ किंवा जातीआधारित हत्या अशी संज्ञा वापरण्यात यावी अशी मागणी दलित कार्यकर्ते कांचा इलाया यांनी केली आहे. जेव्हा एखाद्या दलित किंवा कनिष्ठ जातीतील व्यक्तीची वरील जातीमधील व्यक्तीशी लग्न केल्यामुळे हत्या केली जाते तेव्हा त्याला ऑनर किलिंग म्हणू शकत नाही असं कांचा इलाया बोलले आहेत. दलितांची हत्या जात द्वेषातून केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

‘एखाद्याची हत्या करण्यात कोणती प्रतिष्ठा आहे ? जाती आधारित हत्येला ऑनर किलिंग कसं काय म्हणू शकतो ? दलितांची हत्या त्यांच्या जातीचा द्वेष असल्याने केली जात आहे आणि त्यांनी त्याचा तसाच उल्लेख केला पाहिजे’, असं कांचा इलाया यांनी म्हटलं आहे.

कांचा इलाया यांनी जाती आधारित भेदभाव आणि हत्या हे तेलंगणात निवडणुकीतील मुद्दे असले पाहिजेत असं मत व्यक्त केलं आहे. कांचा इलाया यांनी नुकतीच प्रणय कुमार याच्या घऱी भेट दिली. प्रणय कुमार याची काही दिवसांपूर्वी तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात हत्या करण्यात आली. वरील जातीतील तरुणीशी लग्न केल्याने ही हत्या करण्यात आली. पत्नीच्या वडिलांनी ही हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे.