बनारस हिंदू विद्यापीठात गुरुवारी (२१ सप्टेंबर) एका मुलीच्या छेडछाडीच्या घटनेनंतर करण्यात आलेल्या आंदोलनामागे ‘बाहेरच्या व्यक्ती’ असल्याचा दावा कुलगुरू जी. सी. त्रिपाठी यांनी केला आहे. विद्यापीठाचा परिसर विद्यार्थिनींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सध्याचा वाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाहेरील काही व्यक्तींनी स्वार्थासाठी उकरून काढला, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच प्रत्येक मुलीचे ऐकले तर विद्यापीठाचा कारभार हाकणे कठिण होऊन बसेल, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

कुलगुरू काय म्हणाले?

> विद्यापीठातील घटना दुर्दैवी आहे. त्याचे मला अतीव दुःख आहे. अनेकदा अशा घटना घडतात. पण काही जाणूनबुजून घडवल्या जातात. हा वाद बाहेरच्या व्यक्तींनी उकरून काढला आहे. सध्याची परिस्थिती या घटनेहून अधिक दुर्दैवी आहे. जे असत्य आहे ते सत्य असल्याचे भासवत आहेत. पण विद्यार्थ्यांना तेच खरे वाटत आहे. ही जागा राजकारण करण्याची नाही. तरुण कायम सत्य आणि न्यायासाठी लढतात. पण येथील विद्यार्थ्यांना जे सत्य वाटते त्यासाठी ते लढत आहेत. वास्तवात ते सर्व खोटे आहे.

> काही लोक स्वार्थ साधत आहेत. काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला त्यासंबंधी सूचना द्यायला हवी होती. बनारस हिंदू विद्यापीठच नाही तर देशातील अनेक विद्यापीठे अशा मानसिकतेचे बळी पडले आहेत. पीडितेविषयी सहानुभूती दाखवायला हवी होती तेच लोक याचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. पीडितेने आमच्याकडे तक्रार केली आणि व्यवस्थापनाने त्यावर केलेल्या कारवाईने ती समाधानी आहे. खरे तर संबंधित विद्यार्थिनी या घटनेवरून होणाऱ्या राजकारणावर नाराज आहे.

> विद्यार्थिनींना सुरक्षित वाटेल यासाठी त्यांना सुरक्षा पुरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. आम्ही परिसरात पथदिवे लावले आहेत. तसेच सुरक्षारक्षकही तैनात केले आहेत.

>लैंगिक शोषण नव्हे तर ही छेडछाडीची घटना आहे. पण काही लोक देशासाठी नव्हे तर स्वार्थासाठी काम करत आहेत. त्यांनीच आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. काही विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे या घटनेची सुरुवात कोणी केली याची माहिती मिळू शकली नाही.

> मुले आणि मुलींची वसतिगृहात येण्या-जाण्याची वेळ वेगवेगळी का आहे याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. मुली रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबत नाहीत. वेळेवरून कोणत्याच मुलीची तक्रार नाही. या वेळेत क्लास अथवा इतर कारणांसाठी बाहेर थांबायचे असल्यास लेखी विनंती करून त्या परवानगी घेऊ शकतात. आम्हीही परवानगी देतो. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही विद्यापीठाचा परिसर सुरक्षित वाटत आहे. मुलींना रात्री आठ वाजता आणि मुलांना रात्री दहानंतर वसतिगृहाबाहेर थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. जर आम्ही प्रत्येक मुलीची मागणी मान्य केली तर विद्यापीठाचा कारभार चालवणे कठीण होईल. हे सर्व नियम मुलींच्या सुरक्षिततेसाठीच आहेत.