25 November 2017

News Flash

संपाचा फज्जा!

विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘बंद’ आंदोलनाला बुधवारी देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हरयाणामध्ये एका कामगार

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: February 21, 2013 6:22 AM

विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘बंद’ आंदोलनाला बुधवारी देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. हरयाणामध्ये एका कामगार नेत्याचा झालेला अपघाती मृत्यू, दिल्लीनजीक नॉइडा येथे झालेल्या जाळपोळीच्या घटनांनी या आंदोलनाला गालबोट लावले. बंदमुळे देशभरातील बँक सेवा ठप्प झाली, तर अनेक राज्यांमधील वाहतूक सेवेचेही तीन तेरा वाजले.
बंदचा सर्वाधिक प्रभाव केरळ, त्रिपुरा आणि बिहारमध्ये जाणवला. ओदिशा आणि कर्नाटकमध्ये तुरळक हिंसाचाराच्या घटना घडल्या. राजधानी दिल्लीमधील आर्थिक सेवा ठप्प झाल्या, तर वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. नॉइडा या दिल्लीच्या उपनगरात बंदसमर्थक जमावाने अनेक वाहनांना आगी लावल्या, तर काही कारखान्यांत घुसून तोडफोड आणि लूटमार केली.
ममता बॅनर्जी यांच्या विरोधामुळे पश्चिम बंगालमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कम्युनिस्टांचा प्रभाव असलेल्या कोलकात्यामधील सार्वजनिक बसगाडय़ा तसेच ट्रामसेवा मोठय़ा प्रमाणावर सुरू होत्या.
अंबालात प्रतिबंधात्मक आदेश जारी
अंबाला (पंजाब) : कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपादरम्यान बुधवारी बस रोखण्याचा प्रयत्न करणारा एक कामगार नेता त्या बसवरच आदळला आणि त्यामध्ये नेत्याचे निधन झाले. या प्रकारामुळे अंबाला जिल्ह्य़ात तणावाचे वातावरण पसरले असून अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या नेत्याचे नाव नरेंद्र सिंग असे असून अन्य कामगार सहकाऱ्यांसह बस आगारात बस रोखण्याचा प्रयत्न करताना ते त्याच बसवर आदळले आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कामगारांनी पोलीस ठाण्यावर आणि पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केल्याने जिल्ह्य़ात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
नरेंद्र सिंग हे आगारातील कार्यशाळेबाहेर चालकाच्या आसनाच्या विरुद्ध दिशेला उभे होते. कार्यशाळेच्या फाटकातून बस अचानक बाहेर पडली तेव्हा नरेंद्र सिंग त्या बसच्या दिशेने धावले आणि बसवर धडकून मागे असलेल्या खांबावरही आदळले व खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे ते मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले.
हरयाणा रस्ते कामगार संघटनेचे अध्यक्ष इंदरसिंग भादना यांनी रस्ते मंडळाच्या महाव्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली असून ती पूर्ण होईपर्यंत नरेंद्र सिंग यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.

First Published on February 21, 2013 6:22 am

Web Title: bandh fail