चित्रपटसृष्टीत शिरकाव करून चमकण्याच्या आकर्षणापोटी अनेक तरुणींना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. एका महत्त्वाकांक्षी तरुणीला असाच वाईट अनुभव घेतल्यानंतर बदनामीच्या भीतीपोटी दोन महिने काहीच बोलता आले नाही. मात्र तिने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे.
२२ वर्षांच्या या तरुणीने चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावण्याचे स्वप्न पाहिले होते. सर्व महत्त्वाकांक्षी अभिनेत्रींप्रमाणे, मुंबईत आपले स्वप्न पूर्ण होईल असे तिला वाटले आणि तिला एका दूरचित्रवाणी मालिकेत भूमिकाही मिळाली. नव्या प्रतिभावंतांच्या शोधात असलेले चित्रपट निर्माते किंवा दिग्दर्शक यांच्याशी आपली ओळख करून द्यावी, अशी इच्छा तिने परिचितांकडे बोलून दाखवली. नव्या चेहऱ्यांच्या शोधात असलेल्या एक कन्नड चित्रपट निर्मात्याला आपण ओळखत असल्याचे सांगणाऱ्या बंगळुरू येथील दोन उद्योगपतींशी तिची एका जणाने ओळख करून दिली. हे दोन उद्योगपती आपल्या खऱ्या आयुष्यात खलनायक म्हणून येतील याची तिला कल्पनाही आली नाही.
बंगळुरूमधील एका चित्रपट निर्मात्याने दोन उद्योगपतींशी या तरुणीची ओळख करून दिली. आपण कन्नड चित्रसृष्टीतील आघाडीच्या निर्मात्यांना ओळखत असल्याचे सांगणारे हे दोघे नंतर तिच्या संपर्कात राहिले आणि तिच्यासाठी भूमिका शोधल्याचे सांगून तिला बंगळुरूला बोलावले. या भूमिकेसाठी एक लाख रुपये आगाऊ देण्याचेही त्यांनी मान्य केले. गेल्या २७ मार्चला ती बंगळुरूला गेली, तेव्हा तिला घेण्यासाठी दोघेही विमानतळावर आले होते.
या दोघांनी तिला कोरामंगला येथील एका आलिशान हॉटेलमध्ये उतरवले. दोन दिवस वाट पाहूनही निर्माता आला नाही. ३० तारखेला या तरुणीने परत जाण्याची इच्छा बोलून दाखवली, तेव्हा दोघांनी तिला एक लाख रुपयांचा चेक दिला. यानंतर दोघे तिच्यासोबत शहरात फिरले आणि मार्गात एका पबमध्ये दोघे दारू प्याले.  या दोघांचे आणखी तीन मित्रही तेथे आले होते. सर्वानी जेवणासोबत एक पेयही घेतले. हे पेय प्याल्यानंतर तरुणीची शुद्ध हरवू लागली. त्यावेळी पाचही जणांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे तिला अंधुकसे आठवते.
सकाळी जाग आली, तेव्हा उद्योगपतींपैकी एक जण तिच्या पलंगावर, तर दुसरा दुसऱ्या पलंगावर झोपला असल्याचे तिला दिसले. तिने या घटनेची तक्रार करण्याची धमकी दिली, तेव्हा दोघांनी सांगितले, की आम्ही या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले असून तो आम्ही जाहीर करू आणि तुझ्या वाग्दत्त वरालाही दाखवू. त्याच रात्री या दोघांनी तिला विमानाने मुंबईला परत पाठवले.
या कथित व्हिडीओमुळे आपले भवितव्य धोक्यात येईल या भीतीने तरुणीने झालेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. परंतु नंतर तिने धीर करून मुंबईतील एका वकील मित्राला ही गोष्ट सांगितली.
त्याने कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या एका सदस्यापर्यंत तिची कहाणी पोहचवल्यानंतर त्यांनी हे प्रकरण बंगळुरूच्या उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत नेले. आता दक्षिण-पूर्व विभागाच्या पोलीस उपायुक्तांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.