नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीमधील २१ वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या बलात्कारप्रकरणी शीघ्रगती न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. केवळ १३ वेळा या प्रकरणाची सुनावणी झाली असून हा एक विक्रम आहे.
आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठाविताना पाचवे शहर दिवाणी आणि सत्र न्यायाधीश के. बी. संगन्नवार यांनी नमूद केले की, अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांसाठी कठोर शासनच व्हावयास हवे, असे मार्गदर्शक तत्त्व सर्वोच्च न्यायालयाने आखून दिले आहे.
अपहरण, सामूहिक बलात्कार, दरोडा आणि हल्ला असे आरोप या आरोपींवर ठेवण्यात आले होते आणि त्याबाबत न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी त्यांना दोषी ठरविले होते. न्यायालयाने आरोपींना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदर विद्यार्थिनीवर लैंगिक हल्ला झाल्याने तिला जो मानसिक धक्का बसला आहे त्याची पुरेशी नुकसानभरपाई द्यावी, असा आदेशही न्यायालयाने ‘क्रिमिनल इन्ज्युरीज कॉम्पेन्सेशन बोर्ड ऑफ कर्नाटक’ला दिला आहे. विधी शाखेच्या या विद्यार्थिनीवर आठ जणांनी बंगळुरूच्या ज्ञानभारती संकुलातच सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी तिच्यासमवेत तिचा मित्रही होता. या प्रकरणातील सातवा आरोपी राजा हा अद्यापही फरार असून आठवा आरोपी बालगुन्हेगार असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.