एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी सकाळी बेंगळुरू शहराच्या मध्यवर्ती भागात घडली. या घटनेमुळे एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कॉर्पोरेशन बॅंकेत व्यवस्थापक असलेल्या ज्योती उदय मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एनआर स्क्वेअर परिसरातील आपल्याच बॅंकेच्या एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. त्यानंतर काही क्षणांत एक तरुण आतमध्ये घुसला. त्याने एटीएम केंद्राचे शटर आतून लावून घेतले. ज्योती उदय यांना कोयता आणि खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवून त्याने पैसे काढण्यासाठी धमकावले. ज्योती उदय यांनी पैसे काढण्यास नकार दिल्यावर त्याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यांच्या पर्समधील पैसे, एटीएम कार्ड आणि मोबाईल फोन घेऊन तो तरूण तेथून सव्वा सातच्या सुमारास पळून गेला. डोक्यात वार झाल्यामुळे ज्योती उदय बेशुद्ध पडल्या होत्या. तरुणाने तेथून जाताना एटीएम केंद्राचे शटर बाहेरून लावून घेतले. सकाळी साडेदहा वाजता बॅंकेचे अधिकारी आल्यावर त्यांना हा प्रकार समजला. त्यानंतर ज्योती उदय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये घडलेला प्रकार कैद झाला आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत.