भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने उद्या (बुधवारी) राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे देशात सर्वत्र बांगलादेश आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवणार आहे. प्रणव मुखर्जी हे आमचे खरे मित्र होते असं बांगलादेशनं म्हटलं आहे.

सन १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीयुद्धात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सन २०१३ मध्ये भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशने प्रणव मुखर्जी यांना ‘बांगलादेश मुक्तीजीदो सोम्मानोना’ या पुरस्काराने सन्मानित केले होते. प्रणवदांच्या निधनानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटलं की, “प्रणव मुखर्जी हे बांगलादेशचे खरे मित्र होते. बांगलादेशी जनता त्यांच्यावर खूप आदर आणि प्रेम करीत होती.”

आणखी वाचा- खासदार, केंद्रीय मंत्री ते राष्ट्रपती : प्रणव मुखर्जी यांचा राजकीय प्रवास

“प्रणव मुखर्जी दक्षिण आशियातील अत्यंत आदरणीय नेते होते. अथक परिश्रम करणारे भारतरत्न प्रणव मुखर्जी हे केवळ भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील देशांच्या पुढच्या पिढीतील नेत्यांना कायमच प्रेरणा देत राहतील. भारत-बांगलादेश या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी त्यांचा कायमच पाठिंबा राहिला होता,” असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- प्रणव मुखर्जींच्या जाण्याने संघाचं कधीही न भरुन येणारं नुकसान झालंय : सरसंघचालक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी वयाच्या ८४ व्या वर्षी रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांच्यावर नवी दिल्लीच्या आर्मीच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये नुकतीच मेंदू शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर ते कोमात गेले होते.