बांगलादेशच्या  सरन्यायाधीशपदी एस. के. सिन्हा यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. मुस्लीमबहुल बांगलादेशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी नियुक्ती होणारे ते पहिलेच हिंदू न्यायाधीश आहेत. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद यांनी न्या. सिन्हा यांची नियुक्ती केली. न्या. सिन्हा हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. बांगलादेशात मुख्य न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय ६७ असून न्या. सिन्हा हे ६४ वर्षांचे आहेत. येत्या १७ जानेवारीपासून ते पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.शेख मुजिबूर रेहमान यांच्या हत्येप्रकरणासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्या. सिन्हा यांनी निकाल दिले आहेत. त्याचप्रमाणे घटनेच्या पाचव्या आणि तेराव्या दुरुस्तीबाबतही त्यांनी दिलेला निकाल गाजला आहे.